‘धर्मवीर-3’ येईल, तेव्हा त्याची पटकथा मी लिहीणार; देवेंद्र फडणवीसांचं विधान

मुंबई | शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर’ चित्रपटानं राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फोडल्यानंतर आता ‘धर्मवीर २’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गुरुवारी संध्याकाळी चित्रपटाच्या ग्रँड प्रीमियर सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज धर्मवीर २ च स्क्रीनिंग सुरू झालं आहे. स्वर्गीय आनंद दिघे यांच्या प्रेरक जीवनावर आधारित धर्मवीर १ हा चित्रपट आपण पाहिला. त्यांच्याच प्रेरणेनं जे नेतृत्व उभं राहिलं, ते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सुरुवातीचं अनेक लोकांना माहिती नसलेलं आयुष्य या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलं.
हेही वाचा – बोऱ्हाडेवाडी ‘टी.पी. स्कीम’मधून रहिवाशी क्षेत्र वगळले!
महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात एक राजकीय भूकंप झाला. त्यानंतर साहजिकच सगळ्यांची मागणी होती की ‘धर्मवीर २’ आला पाहिजे. ‘धर्मवीर १’ लोकांनी डोक्यावर घेतला. लोकांना तो अतिशय आवडला. एखाद्या चित्रपटातले चरित्रनायक काल्पनिक असू शकतात. पण आपण ज्यांना पाहिलंय, ज्यांच्याबद्दल वाचलंय, ऐकलंय असे चरित्रनायक जेव्हा पडद्यावर पाहायला मिळतात, तेव्हा लोक आपापल्या पद्धतीने त्यांच्याशी जोडले जातात. हा चित्रपट फक्त मनोरंजनासाठी नसून एक संघर्षगाथा सामान्य माणसापर्यंत जात आहे. यातूनच लोकांना प्रेरणा मिळेल असा मला विश्वास आहे. मलाही चित्रपटाबाबत उत्कंठा आहे. काही गोष्टी मी पाहिल्या आहेत, काही पाहायच्या आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
चित्रपटाच्या पुढील भागात आपली काही प्रमुख भूमिका असेल का? किंवा असा कुठला चित्रपट आपण तयार करण्याचा विचार करत आहात का? अशी विचारणा केली असता त्यावर फडणवीसांनी मिश्किल टिप्पणी केली. जेव्हा धर्मवीर ३ येईल तेव्हा त्याची पटकथा मी लिहीन, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.





