मनोज जरांगेंचं मध्यरात्रीपासून उपोषण; राज्य सरकारला इशारा

Manoj Jarange Patil | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मध्यरात्रीपासून पुन्हा उपोषणाला बसणार असून त्याआधी आज सकाळी माध्यमांशी बोलताना राज्य सरकारला इशारा दिला आहे. तसेच, तुम्हाला जर वाटत असेल की आम्ही राजकारण करू नये किंवा आमच्यामुळे कुणाचा फायदा होऊ नये तर आमच्या मागण्या मान्य करा. नाहीतर नंतर आमच्या नावानं तक्रार करायची नाही, असंही ते म्हणाले.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, आम्ही तुमच्याकडे ९ ते १० मागण्या दिल्या आहेत. त्याची तातडीने अंमलबजावणी करा. त्यात कोणतीही अडवणूक देवेंद्र फडणवीसांनी करू नये. ज्या कुणाला सत्तेची खूप मस्ती आहे, त्यांना आज स्पष्टच सांगतोय. आमच्या नावानं नंतर तक्रार करू नका. तुम्हाला आत्ताच संधी आहे. मला यात राजकारण करायचं नाहीये. मला किंवा माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाहीये. पण आता तुम्ही निर्णय घेतला नाही, तर नंतर आमच्या नावानं आरडाओरड करायची नाही. तुम्हाला संधी म्हणून मी हे उपोषण करणार आहे
सातारा संस्थान, बॉम्बे गव्हर्नमेंट हे तिन्ही लागू करणं आवश्यक आहे. त्याशिवाय, सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी आमच्या व्याख्येप्रमाणे होणं गरजेचं आहे. तेही आचारसंहिता लागू होण्याच्या आत. मागेल त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतही निर्णय व्हायला हवा. हे शब्द त्यांचे आहेत, माझे नाहीत. मराठा व कुणबी एकच आहेत. दोन्ही ८३ क्रमांकालाच आहेत. त्यामुळे सरकारनं याची तातडीनं अंमलबजावणी करायला हवी, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
आंदोलनात फूट पाडणं हे त्यांचं कामच आहे. आजही त्यांचं षडयंत्र चालूच आहे. पण मला आजपासून त्यावर बोलायचं नाहीये. मी सरकारला पुन्हा संधी देतोय की मला आणि माझ्या समाजाला राजकारणाकडे जायचं नाहीये. आमचं ध्येय आहे मराठा आरक्षण. राज्यातला सगळा मराठा समाज कुणबी आहे. याला शेकडो पुरावे उपलब्ध आहेत. तिन्ही गॅजेट तातडीनं लागू करा. सरसकट गुन्हे मागे घेणं, बलिदान गेलेल्या कुटुंबाला सरकारी नोकऱ्या या आमच्या मागण्या आधीच त्यांना दिल्या आहेत, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.





