‘भाजपने टिळक कुटुंबाला वापरून फेकलं’; उद्धव ठाकरेंची टीका

गिरीश बापट यांना प्रचाराला उतरवता हा कुठला अमानुषपणा?
मुंबई : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी मतदारांना ऑनलाइन पद्धतीने संबोधित केलं. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजपाने टिळक कुटुंबाला वापरून फेकलं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
भाजपने आत्तापर्यंत वापरा आणि फेकून द्या असंच धोरण अवलंबलं आहे. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर भाजपाने टिळक कुटुंबीयांना वापरून फेकून दिलं. लोकमान्य टिळकांच्या वंशजांवर हा अन्याय करून भाजपा थांबली नाही. कसब्यातून भलत्याच उमेदवाराला उमेदवारी दिल्यानंतर आजारी गिरीश बापटांना प्रचारात उतरवलं. त्यांची अवस्था पाहून तर मला भाजपाचं क्रौर्य किती भयंकर आहे ते जाणवलं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
काही जण म्हणतात की ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे. ही मागणी रास्त आहे कारण दोन्ही उमेदवारांचं आजारपणाने निधन झालं आहे. मात्र निवडणूक बिनविरोध घेण्यासाठी जो मोकळेपणा होता लोकशाहीत तो आता उरला आहे का? दुर्दैवाने या दोन निवडणुका आल्या आहेत. ज्यांना वाटतं आहे की निवडणूक बिनविरोध व्हावी असं वाटत असेल तर मग कसब्यात लोकमान्य टिळकांचं घराणं वगळून उमेदवारी दिली गेली ती का? असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. उमेदवार बदलल्यानंतर मला खरंच वाईट वाटलं, असं ठाकरे म्हणाले.
गिरीश बापट यांची अवस्था पाहून मला वाईट वाटलं. गिरीश बापट यांचा उमेदीचा काळ मी पाहिला आहे. सर्वात क्रोर्याचा कळस म्हणजे गिरीश बापट गंभीर आजारी असताना प्रचाराला उतरवता हा कुठला अमानुषपणा आहे? असाही प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.





