१० तारखेपासून सलग तीन दिवस केंद्रीय मंत्रीपरिषद बैठका
नवी दिल्ली – नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात गेल्या महिन्यात ७ जुलैला मंत्रीपरिषदेचा फेरबदल आणि विस्तार झाल्यानंतर आता १०, ११ आणि १२ ऑगस्टला सलग तीन दिवस मंत्रीपरिषदेची बैठक घेतली जाणार आहे. दररोज सायंकाळी ६ वाजता ही बैठक सुरू होणार आहे. त्यात मोदी सरकारच्या उरलेल्या कार्यकाळातील अजेंडा निश्चित केला जाणार असून सर्व मंत्रालयांच्या कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे.
मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शनिवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्रीपरिषदेला चहा-पानाचे निमंत्रण दिले होते. त्यानुसार सायंकाळी ६ वाजता ही बैठक झाली. त्यानंतर १० ऑगस्टपासून १२ ऑगस्टपर्यंत सलग तीन दिवस सायंकाळी ६ वाजता मंत्रीपरिषदेची बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत सर्व मंत्रालयांच्या कामाचे उद्दिष्ट निश्चित केले जाणार असून आजपर्यंत या मंत्रालयांनी केलेल्या कामाचा आढावा घेतला जाणार आहे. ही बैठक संसद भवनात होणार आहे. नवीन मंत्री आणि त्यांच्या विभागांना तसेच मंत्रालयांना याची माहिती दिली आहे. नवीन मंत्र्यांना एक महिना झाला आहे. त्यामुळे त्यांच्या कामाचाही आढावा बैठकीत घेतला जाणार आहे. राष्ट्रपती भवनातील चहापाणी आणि मंत्र्यांची ३ दिवस मॅरेथॉन बैठक यामागे मोदी सरकारच्या मोठ्या निर्णयाची शक्यता व्यक्त केली जात आहे.





