#Covid-19: औषध कंपन्यांकडून कृत्रिम टंचाई; मुसक्या आवळण्याचा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा इशारा

नगर |
औषध कंपन्यांनी करोना चाचणी संच व ‘फैबीफ्लू’ या करोना प्रतिबंधक गोळ्यांची कृत्रिम टंचाई निर्माण करून नफेखोरी सुरू केली आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारला या औषध कंपन्यांच्या मुसक्या आवळाव्या लागणार आहेत. लोकांचे हाल करून औषध कंपन्यांनी पैसे कमवण्याचा धंदा सुरू केला आहे. या संदर्भात आपण अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याशी चर्चा केली आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. यापूर्वी चाचणी संच ५७ रुपयांना मिळत होते, आता त्याची किंमत १२० रुपये झाली आहे. तर ‘फैबीफ्लू‘ या गोळ्यांची किंमत ६ वरून २६ रुपये झाली आहे. कंपन्यांना आगाऊ रक्कम देऊनही याची उपलब्धता होत नाही, कारण त्यांनी कृत्रिम टंचाई निर्माण केली आहे. या संदर्भात काढलेल्या निविदांनाही औषध कंपन्या प्रतिसाद देत नाहीत.
नगर जिल्ह्यला ३ लाख गोळ्या उपलब्ध झाल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना चाचणी संच व फैबीफ्लू ज्या जिल्ह्यत मिळतील तेथून खरेदी करण्यास सांगितले आहे, असेही मुश्रीफ यांनी सांगितले. पालक मंत्री मुश्रीफ यांनी आज शुक्रवारी सायंकाळी नगरमध्ये करोना परिस्थितीचा आढावा घेतला, त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली. या वेळी आमदार रोहित पवार , आमदार संतोष काळे ,आमदार डॉक्टर किरण लहामटे, जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, महापालिका आयुक्त शंकर गोरे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यत करोना बाधितांच्या गृह विलगीकरणास मनाई करण्यात आली आहे. तरीही नगर शहरात सुमारे २२०० बाधित गृह विलगीकरणात आहेत, याकडे लक्ष वेधले असता पालकमंत्री मुश्रीफ यांनी अशा बाधितांना मोहीम राबवून कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्याची सूचना मनपा आयुक्तांना दिली आहे.
वाचा- नगर जिल्ह्यातील करोनाबाधितांत उच्चांकी वाढ; ३ हजार ९५३ नवे रुग्ण





