मुंबई ,पुणे नंतर आता नागपूरमध्येही जमावबंदी लागू

करोनावर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई ,पुणे नंतर आता उपराजधानी म्हणजे नागपूरमध्येही सोमवारी रात्रीपासून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. येत्या ३१ मार्च रोजी रात्री १२ वाजेपर्यंत ती कायम राहणार आहे. नियम मोडल्यास एक ते सहा महिन्यांची शिक्षा किंवा दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सहपोलिस आयुक्त रवींद्र कदम यांनी कलम १४४नुसार जमावबंदीचे आदेश सोमवारी सायंकाळी जारी केले. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, क्रीडा, व्यावसायिक प्रदर्शन व शिबिर, पर्यटन, सभा, मेळावे, जत्रा, यात्रा, रॅली, धरणे, आंदोलन सर्व कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. यात एका ठिकाणी पाचहून अधिक नागरिकांनी राहू नये, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. जमावबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही कदम यांनी दिला आहे.

करोनाची लागण होऊ नये, यासाठी नागपूर पोलिसांनीही विशेष काळजी घेतली आहे. लग्नसमारंभ किंवा अंत्यविधी व त्यानंतर होणाऱ्या विधीसाठी हा आदेश लागू होणार नाही. यापूर्वी मॉल, जिम व चित्रपटगृहे बंद ठेवण्यात आली आहेत. सोमवारी सकाळपासूनच पोलिसांनी चित्रपटगृहे, जिम, मॉल बंद आहेत किंवा नाही, याची झाडाझडती घेतली. याशिवाय लॉज व हॉटेल्सनाही विशेष काळजी घेण्याचे निर्देश पोलिसांनी दिले आहेत.





