आता फक्त ‘नवीन पीढीला व्हिजन द्यायचं’, त्यांच्या हातात कारभार सोपवायचा – शरद पवार

पुणे | महाईन्यूज | प्रतिनिधी
महाराष्ट्र आता 60 वर्षाचा झालाय. मी 80 वर्षांचा आहे. या वयात नवीन व्हिजन काय पाहणार. मी राजकारणात काम थांबवायचा विचार करतोय. आता फक्त नवीन पीढीला व्हिजन देऊन त्यांच्या हातात कारभार सोपवायचाय. त्यांच्या कामात फार काही हस्तक्षेप करायचा नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.
शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या महाविकास आघाडीचं सरकार हे पाच वर्षे टीकणार आहे. त्यात काहीही अडचण येणार नाही असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. सरकारबद्दल मला स्वतःला शंका वाटत नाही. महाविकास आघाडीचं सरकार हे संमिश्र सरकार असून या सरकारचे नेतृत्व ज्यांच्या हातात आहे, ते सगळ्यांना घेऊन चालणारे आहेत, आणि दुसऱ्यांच्या कामात ते हस्तक्षेप करत नाहीत, समन्वय समिती मिळून आम्ही एकत्र प्रश्न सोडवतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
मी जरी वरिष्ट असलो तरी सरकारचा रिमोट माझ्या हातात नाही. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार स्थापन करून दिलं आहे. सरकारचं काम व्यवस्थित सुरू आहे. माझ्या त्यामध्ये कसलाही हस्तक्षेप नसतो. कारण, महाराष्ट्र आता 60 वर्षांचा झालाय, तर मी 80 वर्षांचा झालोय. या वयात मी नवीन व्हिजन काय पाहणार. तसंच वयाच्या या टप्प्यावर व्हिजन सांगणं योग्य नाही. मी आता हळूहळू काम थांबवतोय. आता फक्त तरुणांना व्हिजन द्यायचं आणि ते काय करतात ते बघायचं. नवी पिढी पुढे गेली पाहिजे त्यांच्या हातात कारभार दिला पाहिजे, अशी भूमिका शरद पवार यांनी मुलाखतीत मांडली. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.





