ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वाकड-पिंपळे निलखमध्ये स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष; विविध ठिकाणी ध्वजारोहण करून तिरंग्याला मानवंदना

नगरसेविका स्नेहा रणजित कलाटे यांच्या हस्ते सोसायट्या व शाळांमध्ये ध्वजारोहण; ‘विकसित भारत २०४७’साठी योगदान देण्याचे आवाहन

पिंपरी-चिंचवड | भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन वाकड आणि पिंपळे निलख परिसरात मोठ्या उत्साहात, देशभक्तीमय वातावरणात आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. परिसरातील विविध सोसायट्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. यावेळी नगरसेविका सौ. स्नेहा रणजित कलाटे यांच्या हस्ते विविध ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले.

वाकड येथील आईस लँड सोसायटी, मालपाणी ग्रीन सोसायटी आणि ग्रीन व्हॅली सोसायटी येथे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहून सौ. स्नेहा रणजित कलाटे यांच्या हस्ते तिरंगा फडकविण्यात आला. यावेळी सोसायटी कमिटीचे पदाधिकारी, सभासद तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोसायट्यांच्या वतीने सौ. स्नेहा कलाटे यांचा सत्कारही करण्यात आला.

याचबरोबर कै. मारुती गेणू कस्पटे प्राथमिक शाळा, वाकड, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मुले-मुली शाळा, पिंपळे निलख आणि श्री साई इंग्लिश स्कूल, कावेरी नगर, वाकड येथेही उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, कर्मचारी आणि नागरिकांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्य दिनाचा आनंद साजरा केला.

हेही वाचा

पिंपरी-चिंचवडमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘रिअल हिरोज’ पोलीस अधिकाऱ्यांचा विशेष सत्कार!

विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेम आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश

यावेळी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना स्वातंत्र्यसैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या त्यागाचे स्मरण करण्यात आले. राष्ट्राची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्व अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे, असे आवाहन करण्यात आले. देशाची भावी पिढी असलेल्या विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच शिस्त, संस्कार, राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि देशसेवेची भावना आत्मसात करून देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी योगदान द्यावे, अशी अपेक्षा नगरसेविका सौ. स्नेहा रणजित कलाटे यांनी व्यक्त केली.

‘विकसित भारत २०४७’चा संकल्प

‘विकसित भारत २०४७’चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपली भूमिका जबाबदारीने पार पाडण्याची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सक्षम, आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या निर्मितीसाठी युवक, विद्यार्थी आणि नागरिकांनी सकारात्मक योगदान द्यावे, असा संदेशही देण्यात आला. दरम्यान, स्वातंत्र्य दिनानिमित्त वाकड आणि पिंपळे निलख परिसरात सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. *‘जय हिंद’, ‘वंदे मातरम्’ आणि ‘भारत माता की जय’*च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. तिरंग्याच्या साक्षीने नागरिकांनी राष्ट्राच्या प्रगतीसाठी एकजुटीने कार्य करण्याचा संकल्प केला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button