‘पुणे ग्रँड टूर’च्या यशस्वी आयोजनानंतर आता जागतिक स्पर्धेची तयारी
2032च्या ‘युसीआय’ रोड वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी महाराष्ट्राची दावेदारी

महाराष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रातील दावेदारीला मिळणार बळ – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचा विश्वास
मुंबई | पुणे येथे 2032 मध्ये ‘युसीआय’ रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप आयोजित करण्यासाठी निविदा सादर करण्यास तसेच आवश्यक शासन समर्थन, आर्थिक हमी आणि पायाभूत सुविधांबाबत बांधिलकी देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत तत्त्वतः मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रातील दावेदारीला बळ मिळाले आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री तथा क्रीडामंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या, पुणे ग्रँड टूर 2026 च्या यशस्वी आयोजनामुळे महाराष्ट्राने आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा आयोजित करण्याची क्षमता सिद्ध केली आहे. आदरणीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा यशस्वी झाली होती. या स्पर्धेची ‘युसीआय’ नेही दखल घेतली आहे. आता आपण जागतिक दर्जाच्या ‘युसीआय’ रोड वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या यजमानपदासाठी पुढाकार घेत आहोत.
हेही वाचा
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर: १७ खेळाडूंना ‘अर्जुन पुरस्कार’, क्रिकेटपटूंना डच्चू!
‘युसीआय’ रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप 2032 पुण्यात झाल्यास आशियातील पहिल्या यजमान शहराचा मान पुण्याला मिळू शकतो. या स्पर्धेमुळे महाराष्ट्राचे नाव शंभरहून अधिक देशांतील 25 ते 30 कोटी प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून सुमारे 330 कोटींपेक्षा अधिक आर्थिक मूल्यनिर्मिती अपेक्षित आहे. मंत्रिमंडळाने ‘युसीआय’कडे समर्थनपत्र सादर करणे, सुमारे 36.5 लाख रुपये निविदा शुल्क भरणे तसेच सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडीया आणि पुणे ग्रँड टूर समितीला निविदा सादर करण्यास प्राधिकृत करण्यास मान्यता दिली आहे. यजमानपद मिळाल्यास आवश्यक आर्थिक हमी व कराराच्या अटी पूर्ण करण्यासही तत्त्वतः मंजुरी देण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय सहभाग लक्षात घेता परराष्ट्र व गृह मंत्रालयाशी समन्वय साधून व्हिसा सुलभता प्रोटोकॉल तयार करण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेनंतरही सायकलिंगला चालना देण्यासाठी वेस्टर्न घाट सायकलिंग कॉरीडॉर आणि पुण्यासाठी ‘युसीआय’ सिटी लेबल मिळविण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. या स्पर्धेच्या आयोजनामुळे पुणे परिसरातील रस्ते, सुरक्षा, वाहतूक, निवास, वैद्यकीय आणि प्रसारण सुविधांसह आवश्यक क्रीडा पायाभूत सुविधांचा विकास होणार आहे. पुणे ग्रँड टूर 2026 नंतर आता आपण जागतिक स्पर्धेकडे वाटचाल करत आहोत. यामुळे महाराष्ट्रातील युवा खेळाडूंना प्रेरणा मिळेल आणि पुण्याचे आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रातील स्थान अधिक मजबूत होईल, असा विश्वास सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केला.





