breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

होमियोपॅथी डॉक्टरकडून फसवणूक

बुलढाण्याच्या होमियोपॅथी डॉक्टरने वैद्यकीय व्यवसायासोबतच औषधांच्या दुकानाचे बस्तान बसविण्यासाठी फार्मासिस्ट म्हणून राज्य औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) परिषदेकडे नोंदणी केल्याचे उघड झाले आहे.

बुलढाण्याचे खामगावातील संतोष पाठक (५२) होमियोपॅथी डॉक्टर असून समृद्धी क्लिनिकमध्ये वैद्यकीय व्यवसाय करतात. त्यांची पत्नीही डॉक्टर असून त्याही याच क्लिनिकमध्ये कार्यरत आहे. पाठक यांनी क्लिनिकला जोडून समृद्धी मेडिकल नावाने औषधांचे दुकान सुरू केले. औषधांच्या दुकानातील फार्मासिस्ट म्हणून स्वत:चे नाव जोडले आणि अन्न व औषध विभागाकडे ऑनलाइन परवान्यासाठी अर्ज सादर केला. त्यांची कागदपत्रे संशयास्पद असल्याने अधिक चौकशी केली असता हे डॉक्टर म्हणून गेली १० वर्षांहूनही अधिक काळ वैद्यकीय सेवा देत असल्याचे समोर आले. एकाच वेळेस डॉक्टर व फार्मासिस्ट अशी दोन्ही ठिकाणी नोंदणी करून व्यवसाय करत असल्याचा ठपका ठेवत पाठक यांच्याविरोधात कारवाई करत परवाना रद्द केल्याची माहिती बुलढाण्याचे अन्न व औषध प्रशासनाचे साहाय्यक आयुक्त गजानन धिरके यांनी दिली.

पाठक यांनी २०१६-१८ या काळात इंदौर येथील ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यापीठातून फार्मसी विषयात पदविका पूर्ण केल्याची कागदपत्रे सादर करून फार्मासिस्टचा परवाना फेब्रुवारी २०१९ मध्ये प्राप्त केला आहे. परंतु याच काळात ते वैद्यकीय व्यवसायही करत होते. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी फार्मसी परिषदेकडे तक्रार नोंदविल्याचे गजानन धिरके यांनी सांगितले.

इंदौरचे महाविद्यालय नोंदणीकृत असून पाठक यांनी पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे या महाविद्यालयाने कळविलेले आहे. त्यानुसार कागदपत्रांची तपासणी करून आम्ही परवाना दिला. सध्या परिषदेच्या निवडणुका असल्याने परवाना परत करण्याचे आदेश दिलेले आहेत. निवडणुकीनंतर प्रक्रियेनुसार कारवाई केली जाईल, असे फार्मसी परिषदेच्या रजिस्ट्रार सायली मसाल यांनी सांगितले. फाटक यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष कैलास तांदळे यांनी केली आहे.

परराज्यातून पदविका प्राप्त करून महाराष्ट्रात नोंदणी करणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षांत नक्कीच वाढली आहे. पदविका हा पूर्णवेळ अभ्यासक्रम असूनही प्रत्यक्ष महाविद्यालयात न जाऊनही प्रमाणपत्र प्राप्त करणे परराज्यातील महाविद्यालयांमुळे सहज शक्य झाले आहे. परंतु या कागदपत्रांची शहानिशा योग्यरीतीने होणे आवश्यक आहे.

– गजानन धिरके, बुलढाणा अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त

मी होमिओपॅथी वैद्यकीय व्यवसाय करीत आहे. हा व्यवसाय चालत नसल्याने फार्मासिस्टचा परवाना घेतला होता. परंतु आता प्रशासनाच्या आदेशानुसार हा परवाना मी परत करणार आहे.

–  डॉ. संतोष पाठक

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button