breaking-newsताज्या घडामोडीलेख

‘‘हे आदिशक्ती तुझी स्फुल्लिंगशक्ती आम्हाला दे; आता लढाई आम्हीच लढू!

सौ. शीतल करदेकर

छपाक, खट्याक आणि जे काही भयंकर आहे ते आम्हा स्रियांच्या वाट्याला का?  तिच्या शरीराचे लचके तोडणं ,तिच्या शरीरावर क्रुर अत्याचार करणं, तिने नाही ऐकलं तर तिच्यावर अँसिड हल्ला करणं , पेट्रोल,राँकेल ओतून पेटवणं का स्रीच्या वाट्याला? वेदनांचे कल्लोळ आणि जगण्याची ही घुसमट हरक्षणी अब्रुरक्षणासाठी धडपड का? हा सवाल नेहमीचाच!

देशात महनीय व्यक्तींवर राजकारण,धर्मांची लढाई, सत्तेसाठी हीन राजनीती,ग्लँमर..पाचकळ गप्पा  …या सगळ्यांना चँनल्सवर मोठा मोठा टिआरपी! वर्तमानपत्रात याला बक्कळ वाचक!

वर्ध्यात शिक्षिका भर रस्त्यात पेटवली गेली…तिचं जगणं राखं केलं …एका हिंस्त्र पशुने! एकतर्फी प्रेम! हे अस? आणि या एकतर्फीवाल्यांच्या बापाच्या घरचा माल असतो काय लेकीबाळी? त्यांना वाटलं उचलून आणावं त्यांना वाटलं मारावं जाळावं!

आजकाल तर एकतर्फी बोलबच्चन जनता आपली मक्तेदारी असल्याप्रमाणे कपडेफाडू तोंड फुटेपर्यत जाहीर बोलायला लागलेत. काही महिन्यांपुर्वी महनीय आमदार राम कदम यांनी मुलगी पसंत पडली तर उचलून आणण्याची गोष्ट केली. स्वतः जगदंबेचे भक्त असणारे हे रामदादा लेकीबाळीबद्दल असे कसे बोलले?  तरीही माध्यमांत चमकतात कसे? देशपातळीवर असे दिवटे अनेक आहेत,त्यांना वेळीच वठणीवर आणायला हवे,यांचा सामाजिक बहिष्कार करायला हवा तसा प्रसारमाध्यमबहिष्कारही व्हायला हवा. न्यायाची प्रतिक्षा तरी किती करावी ?

उत्तर प्रदेशची पिडिता जळीत कांडातील या देशाच्या लेकीला पूर्ण न्याय मिळालेला नाही.काश्मिरातील त्या छोट्या बालिकेला न्याय मिळालेला नाही. दिल्लीच्या पिडीतेचे गुन्हेगार फाशीपासून लांब आहेत! मराठा मोर्चाची ठिणगी ठरलेली ती कोपर्डीची बळीता न्यायापासून दूर आहे. वर्ध्यातल्या शिक्षिकेवर एकतर्फी प्रेमातून म्हणे हल्ला झाला!

पेट्रोल टाकून नराधमाने जाळलं!

सगळीकडे सगळेच बोलू लागले, चर्चा वाद सुरु झाले! तिचं आयुष्य संपल्यात जमा आहे!आता न्याय मिळाला नाही मिळाला ,तिला काहीही फरक पडत नाहीय! आपण सर्व आमच्या या लेकींचे गुन्हेगार आहोत! आमचा झापडेकरी,संकुचित मानसिकतेचा शिष्ट समाज जबाबदार आहे! हैद्राबादमधे नराधमांना मारलं तेव्हा सर्व खुश झाले..पण पुढे काय? का आपलेचपैकी कुणीतरी कुणाचातरी.. मुलंगा, बाप,भाऊ, नवरा ..ही अशी नीचता करतो?

का तिच्या जगण्याचा हक्क हिरावतो?

का पोलीस यंत्रणा,कायदे वेळीच जागे रहात काम करत नाहीत? का अगदी घरांतून ..गर्भांपासून मुलामुलींना समान न्याय व शिकवणं मिळत नाही? का मनोरंजनाचा,जाहिरातीचा धंदा स्त्रीदेहाचा बाजार लावतो?का स्त्रीला केवळ भोग्यवस्तू म्हणून परोसलं जातं? असे भरमसाठ कां चा आता चिखलराडा झालाय!

 देशातील सगळीच सरकार चालवणारेही स्त्री सुरक्षा ,सन्मान दुय्यम मानतात! तोंडी लावण्यासाठी सबलीकरण गप्पा असतात! महिला आयोग फक्त आराखडे आणि राजकीय मक्तेदारीचा वारसा बनतोय! आमदार बबनराव लोणीकर हे एक  जळजळीत प्रतिक आहेत राजकीय वर्चस्वाच्या पुरुषी मानसिकतेचे! असे महान नेते,अधिकारी सर्वत्र कार्यरत दिसतात!

गर्दी खेचण्यासाठी सभा,कार्यक्रमांना  कलाकाराना बोलावणं बोलवणं गैर नाही. हिराँईनला पहायला लोक येतात , मग आपण काय करता नेते हो? कुठल्या शेतातलं वाळवंटातलं तण उपटता?आणि सरकारी अधिकारी महिलेला हिराँईन जाहिरपणे बोलणारे  हे आणि इतरही खाजगीत काय दिवे लावत असतील हा संशोधनाचा विषय!

तुमचं राजकारण चालू देत…

पण जेएनयु मधे दिपिका गेली..म्हणून अँसिड हल्ल्यासारखा गंभीर विषय असणारा तिचा सिनेमा ‘छपाक’ वर एक प्रकारे बंदी करण्याचा प्रकार घडला आणि पूर्णपणे व्यावसायिक आणि इतिहास सोयीने वळवुन चुकीचा इतिहास सादर करणारा ‘तान्हाजी’ साठी कर मुक्तीची चढाओढ लागली.

आपला समाज आंधळा,मुका बहिरा बनलाय ! ज्या महनीय व्यक्तीमत्वाचा इतिहास आपल्याला आहे,ज्यांचा आदर्श आपण घेणे अत्यावश्यक आहे ते ही फक्त सोयीने वापरता आपणं?

स्त्रीला माणूस म्हणून जगू देणं हे हा समाज  स्वीकारत नाहीय!

आम्ही स्वांतत्र्यानंतरही गुलाम आहोत अशा षंढ मानसिकतेचे…जी फक्त सोयीने हळहळते..आक्रोशते! विविध वाहिन्यांवर वर्ध्याची बातमी आणि पिडीतेच्या वडिलांचा चेहरा डोळ्यावर पट्टी लावून आला. तर दिव्य मराठीने जळीत फोटो टाकला ..निःशब्द दिव्य मराठी म्हणून!इतरांनीही टाकला असावा! समाजमाध्यमांवर एक दिवस निःशब्द रहाण्याचे आवाहन करणारे संदेश वायरल झालेत!ही माध्यमं तरी महिला सुरक्षेचे कायदे नियम पाळतात का?

कोण यांचेवर नियंत्रण ठेवणार?

प्रचंड संताप मनात आहेच..का तिच्या जळलेल्या देहाचे छायाचित्र पसरवले जातेय? का आम्हाला तिच्या तडफडीची जाणीव आतून होत नाही ?का का का…किती दिवस असाच आक्रोश आणि सहानुभूतीच्या लाटेवर स्त्रीत्व मातीमोल आणि देवत्व पदावर झुलणार?

हे भारताऽऽ हे इंडिया ऽऽ हे महाराष्ट्रा ऽऽ कधी सुधारणार आपण? कधी जातपातधर्म लिंग भेदाभेदातून आपण समानतेकडे जाणार? लाज वाटते आम्हाला…या सगळ्याची…देशाची लेक असण्याची!

हे आदिशक्ती तुझी स्फुल्लिंगशक्ती आम्हाला दे!

आता ही लढाई आम्हीच लढू!

सौ. शीतल करदेकर,

संपर्क क्रमांक : 7021616645.

(लेखिका, नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टच्या महाराष्ट्र अध्यक्षा.) 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button