breaking-newsराष्ट्रिय

हिमकडे कोसळून खारदुंगला खिंडीत पाच ठार

पाच जण बेपत्ता; आपत्ती निवारण दलाचे मदतकार्य सुरू

जम्मू-काश्मीरमधील खारदुंगला भागात हिमकडे कोसळून पाच  जण ठार, तर इतर पाच जण बेपत्ता झाले आहेत. ते ज्या ट्रकमधून जात होते तो हिमकडे कोसळून त्याखाली गाडला गेला. लडाखमधील खारदुंगला खिंडीच्या भागात सकाळी सात वाजता ही दुर्घटना घटना घडली, अशी माहिती सीमा रस्ते संस्थेने दिली आहे.

गाडल्या गेलेल्या ट्रकमधील प्रवाशांना सोडवण्यासाठी सीमा रस्ते संस्थेने यंत्रसामुग्री व माणसे पाठवली. पोलीस, लष्कर, राज्य आपत्ती निवारण दल यांचे जवान घटनास्थळी पोहोचले असल्याचे सांगण्यात आले. आतापर्यंत तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले असून इतर बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे.

लेहचे पोलिस उपायुक्त अव्हनी लवासा यांनी दिलेल्या माहितीनुसार मात्र,  गाडले गेलेले नागरिक हे घटनास्थळी बर्फ खोदून काढण्याचा प्रयत्न करीत होते. त्यामुळे हिमस्लखन होऊन ही दुर्घटना घडली असावी, असे त्यांचे म्हणणे आहे. खारदुंगला हे ठिकाण लडाखमध्ये १८ हजार ३८० फूट उंचीवर असून तेथे सध्या उणे पंधरा अंश सेल्सियस तापमान आहे.

दरम्यान, हिमाचल प्रदेशात मनालीतही हिमपात सुरू असून केलांग येथे तापमान उणे १० अंश होते. २४ तासांत तेथे तीन सें.मी हिमपात झाला आहे. येथील जनजीवनावर परिणाम झाला आहे. उत्तराखंडमध्ये धामसमवेत हिमालयात मोठय़ा प्रमाणावर हिमपात सुरू आहे. दिल्लीत १ ते १४ जानेवारी दरम्यान थंडीने २३ जणांचा मृत्यू झाल्याचे सेंटर फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट या संस्थेने म्हटले आहे.

जम्मू-काश्मीरचा संपर्क तुटला

खराब हवामानामुळे बुधवार व गुरुवार असे दोन दिवस श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानसेवा बंद होती. तेथे हिमवर्षांवाने २२ उड्डाणे रद्द करण्यात आली असून जम्मू-काश्मीरचा देश व जगाशी संपर्क तुटला आहे. काश्मीरमधील नऊ जिल्ह्य़ांत हिमकडे कोसळण्याचा इशारा देण्यात आला असून त्यात अनंतनाग, बडगाम, बारामुल्ला, बांदीपोरा, गांदरबल, कारगिल, कुलगाम, कुपवाडा, लेह -लडाख यांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button