breaking-newsराष्ट्रिय

ममतांच्या ‘एकता’ सभेला राहुल यांचा पाठिंबा

काँग्रेस अध्यक्षांचे ‘दीदीं’ना समर्थनाचे पत्र

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी शनिवारी भाजपविरोधी राजकीय पक्षांना एकत्र आणणारी ‘भारतीय एकता सभा’ आयोजित केली आहे. कोलकाता येथे होणारी ही सभा म्हणजे सत्ताधाऱ्यांविरोधातील आघाडीचा आणखी एक प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. पंतप्रधानपदाच्या उमेदवार मानल्या जाणाऱ्या ममतांच्या या सभेला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी उपस्थित राहणार नसले तरी त्यांनी ‘ममतादीदीं’ना पत्र पाठवून पूर्ण समर्थन जाहीर केले आहे.

लोकशाही, सामाजिक न्याय आणि धर्मनिरपेक्षता या तीन आधारांवर खऱ्या राष्ट्रवादाचे रक्षण होऊ शकते आणि देशाचा विकास साधता येऊ शकतो. भाजप आणि मोदी नष्ट करू पाहात असला तरी या तीन आधारांच्या रक्षणासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र आहे, असे नमूद करून राहुल गांधी पत्रात म्हटले आहे की, सभेच्या माध्यमातून विरोधकांच्या एकतेचे दर्शन घडेल आणि देशवासींसाठी शक्तिशाली संदेश आपण देऊ शकू अशी आशा आहे.

मोदी सरकारच्या फसवी आश्वासने आणि खोटेपणामुळे देशातील लाखो लोकांचा भ्रमनिरास झाला आहे. सरकारच्या फसवणुकीविरोधात लोक उभे राहात असून त्यांची ताकद नवी आशा घेऊन येत आहे. देशातील प्रत्येक व्यक्तीचा आवाज ऐकला जाईल. ही व्यक्ती कोणत्याही धर्माची, कुठल्याही आर्थिक वर्गातील असो वा कोणत्याही प्रदेशातील असो तिचा आदर केला जाईल, असा आशाआकांक्षेने भरलेला उद्याचा भारत असेल. त्यासाठी आपण एकत्रितपणे प्रयत्न केले पाहिजेत, असे राहुल यांनी पत्रात नमूद केले आहे.

काँग्रेसच्या महाआघाडीत ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस सहभागी झालेला नाही. त्यामुळे राहुल गांधी यांनी त्यांच्या सभेला उपस्थित राहण्याचे टाळले आहे. मात्र या सभेत काँग्रेस सहभागी होणार असून पक्षाचे प्रतिनिधित्व मल्लिकार्जुन खरगे करणार आहेत. ममता यांनी भाजपविरोधी सर्व राजकीय पक्षांना निमंत्रण दिले आहे. उत्तर प्रदेशात आघाडी करणारे सप आणि बसप यांच्यापैकी सपचे प्रमुख अखिलेश यादव सभेला उपस्थित असतील. मात्र बसपच्या सर्वेसर्वा मायावती सभेला येण्याची शक्यता नसल्याचे सांगितले जाते. ममता यांनी गेल्या ऑगस्टपासून एकता सभेची तयारी केली होती. पावसाळी अधिवेशनात ममतांनी संपूर्ण दिवस संसदेत घालवून विविध नेत्यांच्या भेटी घेऊन सभेचे निमंत्रण दिले होते. ही सभा ममतांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेचा भाग असल्याचेही मानले जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button