breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकराष्ट्रिय

हिंदी भाषेत ‘ळ’ च्या ऐवजी ‘ल’चा वापर केल्यास केंद्र सरकारकडे तक्रार करता येणार

मराठीतील आणि हिंदीच्या उपभाषांमधील शब्दाचा उच्चार हिंदीत करताना किंवा देवनागरीमध्ये लिहिताना ‘ळ’ हे मुळाक्षर डावलून ‘ल’चा वापर आता करता येणार नाहीये. ‘ळ’ला टाळून ‘ल’चा वापर केल्यास केंद्र सरकारकडे तक्रार करता येणार आहे. केंद्र सरकारच्या हिंदी विभागाने ‘ळ’च्या वापराबाबतचे परिपत्रक रेल्वे, बँकांसह सर्व सरकारी कार्यालयांना पाठविले आहे. यापुढे हिंदीत लोणावळा, बाळासाहेब असे शब्द लिहिता येतील. ‘ळ’चा ‘ल’ करणे सूचनांचा भंग करणारे ठरणार आहे.

भाषा अभ्यासक प्रकाश निर्मळ यांनी केंद्र सरकारकडे वर्षभर पाठपुरावा केल्यानंतर या प्रयत्नांना यश मिळाले आहे. हिंदीमध्ये ‘ळ’ऐवजी ‘ल’चा वापर करणे चुकीचे असल्याचे निर्मळ यांनी पटवून दिले आहे. हिंदीमध्ये ‘ळ’च वापर करण्यात यावा, यासाठी त्यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान व राज्यपाल कार्यालय तसेच केंद्रीय गृहमंत्रालयाचा राजभाषा विभाग, उच्च शिक्षण मंत्रालयाचा हिंदी विभाग, प्रसारण मंत्रालय यांना वारंवार पत्र लिहिले. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल यांना ट्विट केले. यानंतर हिंदी विभागाने याबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे.

‘या संदर्भातील निर्णय गेल्यावर्षी घेतला असल्याचे दाखवले जात असले तरी त्याची कोठेही अमंलबजावणी झालेली दिसत नाही. आजही सर्व ठिकाणी ‘ळ’चा उच्चार आणि उल्लेख ‘ल’च्या वापरातून होतो. उर्दूमध्ये ‘ळ’ नाही; पण हिंदीच्या उपभाषांमध्ये ‘ळ’ आहे.

‘ळ’ अक्षर हिंदीच्या परीवर्धित वर्णावलीत स्वीकृत करण्याचा निर्णय ऐतिहासिक आहे. यापुढे रेल्वे, बॅंका तसेच सर्व केंद्र सरकारी कार्यालयांना स्थानिक नावात बदल करता येणार नाही. ‘ळ’ ऐवजी ‘ल’ लिहिणे सूचनांचा भंग ठरेल,’ असे निर्मळ यांनी ‘मटा’ला सांगितले. ‘ळ’चा ‘ल’ केलेला आढळला तर केंद्र सरकारच्या हिंदी आणि राजभाषा विभागाकडे तक्रार करावी,’ असे निर्मळ यांनी सांगितले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button