breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

हिंदी गाणी वाजविल्याने मनसेने काढले घंटा गाडीचे स्पीकर

पिंपरी |महाईन्यूज|

महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे. मराठी ही समृद्ध भाषा असून ती महाराष्ट्रीय नागरिकांची मातृभाषा आहे. तिच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील जनतेला स्वच्छतेविषयक संदेश देऊ शकतो. तो हिंदी भाषेपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहचू शकतो, तरीदेखील महापालिकेचा आरोग्य विभाग शहरात फिरवत असलेल्या घंटा गाड्यांच्या स्पीकरमार्फत हिंदी गाणी वाजवून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु महाराष्ट्रात मराठीलाच प्राधान्य असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगवी परिसरात घंटा गाडीचा स्पीकर काढून टाकला आहे.

दररोज सकाळी ओला कचरा, सुका कचरा, घातक कचरा यांचे विलगीकरण कसे केले पाहिजे याचा संदेश गाडीवर बसविलेल्या स्पीकरच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविला जातो. परंतु हे रेकॉर्डिंग हिंदी भाषिक आहे. बिहारच्या भोजपुरी भाषेत ते केले आहे. त्यामुळे सकाळी मराठी गाणी ऐकू येण्याऐवजी सर्वत्र हिंदी गाणी ऐकू येतात. महाराष्ट्र शासनाने मराठी भाषा अनिवार्य केली आहे. सरकारी कामकाजामध्ये तिचा वापर करणे बंधनकारक असताना प्रशासन या नियमांना तिलांजली देत आहे.

“तो का करे भैय्या… गाडीवाला आया घरसे कचरा निकाल’ ही असली भसाडी गाणी लावून रोज सकाळी काय बिहारच्या जनतेला आवाहन केले जात आहे का? रोज झोपताना महाराष्ट्रात झोपतोय अन्‌ सकाळ बिहारमध्ये होतीये की काय असा भास होत आहे. त्याविरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी संबंधित गाड्यांवरचे स्पीकर काढून तसेच उद्यापासून परत असली गाणी वाजवली तर कडक कारवाईचा इशारा ही दिला आहे.

महापालिका प्रशासनाने याची दखल घेऊन अशी हिंदी भाषिक गाणी बंद करून मराठी गाण्याच्या माध्यमातून नागरिकांना स्वच्छतेसंबंधी व कचरा विलगीकरणासंबंधी संदेश द्यावा, अशी मागणी नागरिकांनी व मनसे पदाधिकारी यांनी केली आहे. या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजू सावळे, विशाल पाटील, सुरेश सकट, गणेश माने, महेश केदारी, मंगेश भालेकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button