breaking-newsपुणे

मुसळधार पावसानंतर येरवडा क्षेत्रीय कार्यालयासमोर पाच फूट पाणी

  • महापालिका प्रशासन ढिम्म; नगर रस्त्यावरील कोंडीचे खापर पोलिसांवर

बारा वर्षांच्या पाठपुराव्यानंतरही महापालिका प्रशासन ढिम्म असल्याचे रविवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे स्पष्ट झाले. शहरातील अनेक रस्त्यांवर मुसळधार पावसामुळे खड्डे पडल्याने वाहतूक कमालाची संथ होऊन कोंडी होत आहे, तर रविवारी सायंकाळी नगर रस्त्यावरील येरवडा क्षेत्रीय कार्यालयासमोर पाच फूट पाणी साठले होते. त्यामुळे नगर रस्त्यावर कोंडी झाल्याने वाहनांची रांग दोन ते अडीच किलोमीटरपर्यंत जाऊन पोहोचली. अखेर वाहतूक पोलिसांनी ड्रेनेजची झाकणे उघडून पाण्याचा निचरा केला.

यंदा मुसळधार पावसाने शहराला झोडपून काढले आहे. मान्सून माघारी फिरला असला तरी अवेळी सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील बहुतांश रस्त्यावर पुन्हा खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात खड्डे बुजविण्यासाठी डांबर तसेच खडीचे मिश्रण ओतून तात्पुरत्या स्वरुपात मलमपट्टी करण्यात आली. मात्र, पावसाच्या तडाख्यात महापालिकेकडून खड्डे बुजविण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना तोकडय़ा असल्याचे उघडकीस आले. नगर रस्त्यावरील गुंजन टॉकीज चौकात तसेच नगर रस्त्याकडे जाणारी वाहतूक मंगळवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे ठप्प झाली. महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयासमोर काही वेळात चार ते पाच फुट पाणी साठले. त्यामुळे येरवडा भागातून नगर रस्त्याकडे जाणारी वाहतूक कोलमडून पडली.

नगर रस्त्यावरील वाहतुकीचा ताण वाढत गेला. बंडगार्डन येथील जुना पूल, नवीन पूल तसेच सादलबाबा चौकापर्यंत वाहनांची रांग लागली. पाणी साठल्यानंतर या भागातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून प्रयत्न सुरू करण्यात आले. येरवडा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे आणि कर्मचाऱ्यांनी कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, साठलेल्या पाण्याचा काही केल्या निचरा होत नसल्याने वाहतुकीची समस्या आणखी बिकट झाली. वाहतूक पोलिसांनी याबाबतची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिली. पाण्याचा निचरा केल्यास वाहतुकीचा वेग वाढेल, असे सांगण्यात आले. मात्र, रात्री उशिरापर्यंत या भागात

महापालिकेच्या ड्रेनेज विभागातील कर्मचारी फिरकले नाही. अखेर स्थानिक रहिवासी आणि पोलिसांनी पाण्याचा निचरा करण्यासाठी ड्रेनेजची झाकणे उघडली. त्यानंतर या भागातील पाणी हळूहळू कमी होत गेले.

  • तक्रार बारा वर्षांपूर्वी पण अद्याप दखल नाही

नगर रस्त्यावरील गुंजन टॉकीज चौकात महापालिकेचे येरवडा क्षेत्रीय कार्यालय आहे. नगर रस्ता हा शहरातील महत्त्वाचा रस्ता आहे. या भागात अनेक बहुराष्ट्रीय बँका, माहिती-तंत्रज्ञान कंपनीची कार्यालये आहेत. विमानतळाकडे जाणारे प्रवासी या रस्त्याचा वापर करतात. या भागात मुसळधार पाऊस झाल्यानंतर मोठय़ा प्रमाणावर पाणी साठत असल्याची तक्रार वाहतूक शाखेतील एका अधिकाऱ्याने २००८ मध्ये महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाकडे केली होती. मात्र, बारा वर्षांनंतर या तक्रारीचे निराकरण करण्यात आले नाही, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. दरम्यान, नगर रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू आहे. तेथे जाळ्या टाकल्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही, असे महापालिकेकडून सांगण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button