breaking-newsराष्ट्रिय

हनी ट्रॅप रॅकेटमध्ये फडणवीस सरकारमधील ‘या’ मंत्र्याचा सहभाग; दिग्विजय सिंह यांचा आरोप

मध्य प्रदेशमध्ये देशातील सर्वात मोठे हनी ट्रॅप रॅकेट उघडकीस आलं आहे. अतीमहत्त्वाच्या व्यक्तींशी या हनी ट्रॅप रॅकेटचा थेट संबंध असल्याचे बोलले जात आहे. या हनी ट्रॅप रॅकेटच्या तपासादरम्यान सेक्स स्कँडलच्या तब्बल चार हजार फाईल्स पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. याप्रकरणावरुन आता राजकारणही चांगलेच तापले आहे. काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी यावरुनच भाजपावर टीका केली असून त्यांनी या प्रकरणात भाजपाच्या काही मंत्र्यांची नावे घेत हे मंत्रीही या प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे दिग्विजय सिंह यांनी खुलासा करताना महाराष्ट्रातील फडणवीस सरकारमधील एका मंत्र्याचे नाव घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे.

या हनी ट्रॅप रॅकेटची मुख्य सुत्रधार असणाऱ्या श्वेता जैन हिने विशेष तपास पथकासमोर अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. ‘मध्य प्रदेशमधील भारतीय जनता पार्टीच्या युवामोर्चाच्या अध्यक्षपदी जितू जिराती होते तेव्हा या रॅकेटची मुख्य सुत्रधार श्वेता जैन ही युवा मोर्चाची सरचिटणीस होती. पत्रकारांनी श्वेताची अधिक माहिती काढल्यास बरेच खुलासे होतील,’ असं दिग्विजय यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. इतकंच नाही तर दिग्विजय सिंह यांनी महाराष्ट्रातील एका मंत्र्याचाही या प्रकरणामध्ये समावेश असल्याचे म्हटले आहे. ‘देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचाही प्रकरणामध्ये सहभाग आहे. ज्यावेळी हे प्रकरण घडले तेव्हा निलंगेकर हे महाराष्ट्र युवा मोर्चाचे अध्यक्ष होते,’ असा आरोप दिग्विजय सिंह यांनी केला आहे. ‘जेव्हा श्वेताचा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा ती महाराष्ट्रामध्ये कोणाबरोबर होती?, श्वेता आणि निलंगेकर यांचे काय संबंध आहेत हे प्रसारमाध्यमांनी शोधून काढावे,’ असंही दिग्विजय म्हणाले आहेत. संभाजी पाटील निलंगेकर हे सध्या राज्यातील फडणवीस सरकारमध्ये कामगारमंत्री आहेत.

भाजपा नेते जितू जिराती यांनी दिग्विजय सिंह यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ‘मी राज्यातील युवा मोर्चाचा अध्यक्ष असताना श्वेता जैन सरचिटणीस नव्हती,’ असं जितू यांनी म्हटलं आहे. या प्रकरणामध्ये मध्य प्रदेशमधील कमलनाथ सरकारने चौकशी सुरु केली आहे.

देशातील सर्वात मोठा ब्लॅकमेलिंग सेक्स स्कॅण्डल म्हटल्या जाणाऱ्या या प्रकरणात आतापर्यंत तपास यंत्रणांनी चार हजाराहून अधिक फाईल्स तयार केल्या असून अद्यापही तपास सुरु आहे. या गँगने आतापर्यंत चार राज्यातील महत्त्वाचे नेते, आयएएस अधिकारी, इंजिनिअर आणि मोठे व्यापारी यांना आपलं शिकार बनवलं आहे. सेक्स व्हिडीओ, अश्लिल चॅट तसंत ब्लॅकमेलिंग करण्यात आल्याचे इतर पुरावे टोळीतील सदस्यांच्या लॅपटॉप आणि मोबाइलमधून हस्तगत करण्यात आले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button