स्थायी समिती सभापती पदी विलास मडिगेरी यांची निवड
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती पदी अखेर भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक विलास मडिगेरी यांची निवड झाली आहे. मडिगेरी यांना 12 मते मिळाली. तर राष्ट्रवादीचे मयूर कलाटे यांना 4 मते मिळाली. शिवसेनेचे मत मडिगेरी यांना मिळाले.
स्थायी समिती सभापती पदासाठी नगरसेवक विलास मडिगेरी यांना भाजपची उमेदवारी दिली होती. त्यामुळे भाजपचेच विजय उर्फ शितल शिंदे यांनी पक्षाच्या विरोधात बंडखोरी करत राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर आपला अर्ज भरला होता. शेवटी शिंदे यांनी आपला अर्ज मागे घेतल्यामुळे भाजपचे विलास मडिगेरी यांची सभापती पदी निवड झाली आहे. शिंदे यांनी मागार घेतल्यामुळे राष्ट्रवादीचे मयूर कलाटे आणि मडिगेरी यांच्यात हात वर करून मतदान घेण्यात आले. त्यात मडिगेरी यांना 12 मते मिळाली. तर, 4 मते मयूर कलाटे यांना मिळाली. शिवसेनेचे एक मत देखील भाजपचे मडिगेरी यांनाच मिळाले. त्यामुळे मडिगेरी यांची सभापती पदावर मताधिक्याने निवड झाली आहे.