breaking-newsमनोरंजन

‘सैराट’चा विषय देशभर पोहोचविणे हाच हेतू’

‘धर्मा प्रॉडक्शन’ची निर्मिती असलेल्या ‘धडक’ चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर ५० कोटींचा आकडा पार केला असून हा आकडा हळूहळू शंभर कोटीच्या दिशेने वाटचाल करतो आहे. नवोदित कलाकारांचा चित्रपट असूनही चांगली कमाई करणारा चित्रपट म्हणूनही त्याची नोंद झाली आहे. एकीकडे नागराज मंजूळे दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपटाचा रिमेक असल्याकारणाने त्याच्याशी होणारी तुलना, त्यातून निघालेला टीकेचे स्वर या सगळ्यातून तावून सुलाखून चित्रपट बऱ्याच प्रमाणात यशस्वी ठरला असल्याने निर्माता करण जोहर, दिग्दर्शक शशांक खेतान आणि कलाकारांनीही आनंद व्यक्त केला. मात्र कितीही टीका झाली तरी ‘सैराट’चा विषय ‘धडक’च्या माध्यमातून देशभर पोहोचवण्याचा आपला उद्देश सफल झाला असल्याचे मत करण जोहरने व्यक्त केले. ‘सैराट’ ही अद्वितीय कलाकृती असल्याचे मान्य करत ती पुन्हा निर्माण होऊ शकत नाही, हेही त्याने सांगितले.

‘धडक’ हा चित्रपट एकीकडे प्रेक्षकांची वाहवा मिळतोय तर दुसरीकडे नेटक ऱ्यांचे टोमणे, काही प्रेक्षकांच्या कडव्या प्रतिक्रिया, ‘सैराट’शी तुलना, गाण्यांमुळे उडवली जाणारी खिल्ली यालाही या चित्रपटाशी जोडल्या गेलेल्या सर्वानाच तोंड द्यावं लागत आहे. पण ही सगळी नकारात्मकता ‘धडक’च्या चमूला बरंच काही शिकवून गेली. आपल्यासाठी हा एक वेगळा प्रवास होता, अशा भूमिकेतून या चित्रपटाचे यशापयश स्वीकारले असल्याचे निर्माता-कलाकारांनी स्पष्ट केले. याविषयी नुकतीच करण जोहरने आपली भूमिका स्पष्ट केली. तो म्हणाला, ‘सैराट’शी धडकची तुलना होणं साहजिकच आहे. पण त्याचा रिमेक करण्यामागे आमचीही निश्चित अशी बाजू आहे. दिग्दर्शक शशांक खेतानने ‘धर्मा प्रॉडक्शन’साठी याआधी दोन चित्रपट केलेत. पण ‘धडक’ ही त्याची धर्मासोबतची सर्वोत्तम कलाकृती आहे, अशी कौतुकाची पावतीही करणने दिली. शशांकने ‘सैराट’ पाहिल्यावर माझ्यासमोर रिमेक करण्याची जबरदस्त इच्छा व्यक्त केली. तेव्हा खरंतर मी घाबरलो होतो, पण शशांकला हा चित्रपट इतका आवडला होता की, मी त्याला माझ्या पद्धतीने सादर करतो असे आश्वासन दिले. चित्रपटाचा विषय अजून मोठय़ा स्तरावर प्रेक्षकांपर्यंत पोहोचला पाहिजे हा विचार आम्ही केला होता. दिग्दर्शक शशांकही मत व्यक्त करताना म्हणाला की, ‘मी राजस्थानी आहे. तिथली संस्कृती माझ्या परिचयाची आहे. त्यामुळे तिथल्या पाश्र्वभूमीवर मी या चित्रपटाचं लेखन केलं. माझ्यासाठी हे शिकणं होतं. प्रेक्षकांच्या चांगल्या-वाईट दोन्ही प्रतिक्रियांचं मी स्वागतच करतो.’

‘सैराट’ हा चित्रपट अद्वितीय कलाकृती आहे. त्याच्यासारखा चित्रपट पुन्हा बनवणं कुणालाच शक्य नाही. नागराज मंजुळेंनी जसं मांडलंय त्याची बरोबरी कोणीच करू शकत नाही. आमच्यासाठी हे हिंदीत करताना अतिशय आव्हानात्मक होतं. कारण आम्हाला माहिती होतं एकतर तुलना होणार, त्याचबरोबर या चित्रपटात नवोदित कलाकार आहेत. पण कलाकारांनी खूप छान काम केलं. इशान आणि जान्हवीने उत्तमरीत्या त्यांच्या भूमिका साकारल्या. आताची नवी पिढी चित्रपट स्वीकारताना विविध आशय-विषय असलेले चित्रपट निवडते, ती तद्दन मसालापटांची निवड करत नाही. याचं कौतुक वाटतं, असं करणने या वेळी बोलताना सांगितलं.

आता तर असं झालंय हिंदीतील ‘धडक’ चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक पुन्हा मराठी चित्रपट ‘सैराट’ बघायला जात आहेत. ‘धडक’ची तुलना ‘सैराट’शी वारंवार होत राहिली, पण आम्ही निराश झालो नाही. मुळात आम्ही ‘सैराट’ चित्रपटाचे चाहते आहोत. ‘धडक’ चित्रपटाचा प्रवास आमच्यासाठी वेगवेगळ्या स्तरांवर एक अनुभव होता. त्यामुळे चांगल्या-वाईट प्रतिक्रियांची आधीच तयारी ठेवली होती. मोठय़ा पडद्यावर गोष्ट मांडण्याची प्रत्येकाची वेगळी शैली असते. ‘धडक’ चित्रपटाकडे वैगळ्या शैलीत कथा सादर करणारी कलाकृती म्हणून पहा, असं आवाहनही त्याने केलं. एकूणच तुलना व्हावी पण ती योग्य मुद्दय़ांवर व्हावी, असा करणचा सूर होता. मात्र ‘धडक’ला मिळालेले यश पाहता निदान हा विषय लोकांपर्यंत पोहोचवण्यात आपण यशस्वी ठरल्याचा आनंदही त्याच्या चेहऱ्यावर झळकत होता.

‘सैराट’ हा चित्रपट अद्वितीय कलाकृती आहे. त्याच्यासारखा चित्रपट पुन्हा बनवणं कुणालाच शक्य नाही. नागराज मंजुळेंनी जसं मांडलंय त्याची बरोबरी कोणीच करू शकत नाही. आमच्यासाठी हे हिंदीत करताना अतिशय आव्हानात्मक होतं. ‘सैराट’शी ‘धडक’ची तुलना होणं साहजिकच आहे. पण त्याचा रिमेक करण्यामागे आमचीही निश्चित अशी बाजू आहे. चित्रपटाचा विषय अजून मोठय़ा स्तरावर प्रेक्षकांपर्यंत पोहोचला पाहिजे हा विचार आम्ही केला होता.    – करण जोहर

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button