breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

सुक्या कचऱ्यावरही आता प्रक्रिया

महापालिका जागतिक स्तरावर निविदा मागवणार

मुंबई : मुंबईतील ओला व सुका कचरा यांचे वर्गीकरण करून ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जात असली तरी आता सुका कचऱ्यावरही प्रक्रिया केली जाणार आहे. या सुका कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेच्यावतीने जागतिक स्तरावर निविदा मागवण्यात येत आहेत. घरोघरी निर्माण होणारा सुका कचरा वाहून नेत त्याचे वर्गीकरण करण्याची जबाबदारी संबंधित संस्थेची राहणार असून यासाठी संपूर्ण मुंबईत चार भूखंड उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे गोळा झालेल्या सुका कचऱ्याचे वर्गीकरण करून प्लास्टिकसह ई-वेस्टची विक्री केली जाईल आणि उर्वरीत टाकावू कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची संपूर्ण जबाबदारी ही त्या संस्थेवर राहणार आहे.

मुंबईत दरदिवशी निर्माण होणाऱ्या ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरणासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. गृहनिर्माण सोसायटय़ांमध्ये वर्गीकृत होणारा सुका कचरा महापालिकेच्या सफाई कामगारांकडून ओल्या कचऱ्यामध्येच मिसळला जात असल्याचा आरोप केला जातो. परंतु हा सुका कचरा वाहून नेण्यासाठी महापालिकेच्यावतीने आता परिमंडळ निहाय कंत्राटदाराचीही नेमणूक करण्यात आली आहे. तसेच पुढील सात वर्षांकरता नेमण्यात आलेल्या कचरा कंत्राटातील गाडय़ांमध्ये सुका कचरा वाहून नेण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्यात यशस्वी न ठरलेल्या महापालिकेच्यावतीने आता सुका कचऱ्यावर प्रक्रिया करून विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी जागतिक स्तरावर अभिरुची स्वारस्य अर्ज मागवले जाणार असून यामध्ये सुका कचरा प्रक्रिया केंद्रासाठी पश्चिम उपनगरात २, पूर्व उपनगरात ०१ आणि शहरात १ याप्रमाणे चार भूखंड उपलब्ध करून दिले जाणार आहे. हे सर्व भूखंड प्रत्येकी सरासरी ५ हजार चौरस फुटांचे असतील.

गृहनिर्माण सोसायटय़ांमधून निर्माण झालेला सुका कचरा प्रक्रिया केंद्रापर्यंत वाहून आणल्यानंतर त्याचे वर्गीकरण केले जाईल. त्यातून ज्या प्लास्टिक वस्तू, बाटल्या तसेच ई-वेस्ट यांची पुनप्र्रक्रियेसाठी विक्री केल्यानंतर जो टाकावू सुका कचरा शिल्लक राहिल त्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्याचीही जबाबदारीही संबंधित संस्थेची राहणार आहे. स्वच्छ भारत अभियानाचे महापालिकेतील समन्वयक व सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनीही याला दुजोरा दिला असून याबाबत कंपन्यांकडून स्वारस्य अर्ज मागवले जाणार आहे. ज्यामध्ये सुका कचरा प्रक्रियेसाठी महापालिकेच्यावतीने भूखंड उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे स्पष्ट केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button