breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

सीमेवरील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे चीनचे स्पष्टीकरण

भारतालगत सीमेवर परिस्थिती स्थिर व नियंत्रणात असून दोन्ही देशात संवाद व सल्लामसलतीच्या मार्गाने प्रश्न सोडवण्यासाठी यंत्रणा कार्यरत आहेत, असे चीनने बुधवारी म्हटले आहे. भारत व चीन यांच्यात सीमेवर तणावाची स्थिती असल्याच्या पार्श्वभूमीवर चीनने हे स्पष्टीकरण केले आहे.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी सांगितले की, दोन्ही देशातील सीमा प्रश्नाशी निगडित चीनची भूमिका सातत्यपूर्ण व स्पष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यात दोनदा अनौपचारिक चर्चा झाल्या होत्या त्यावेळी सीमेवर शांतता निर्माण करण्यासाठी विश्वासवर्धक उपायांवर भर देण्यात आला होता. तेव्हा दोन्ही नेत्यात जे मतैक्य झाले त्या दिशेनेच आमची वाटचाल सुरू आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने याआधी असे म्हटले होते की, अध्यक्ष जिनपिंग यांनी भारतालगत सीमेवर युद्धसज्जतेसाठी कुमक वाढवण्याचे आदेश दिले आहेत. देशाच्या सार्वभौमतेचे निकराने रक्षण केले पाहिजे असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले होते. त्यावर झाओ यांनी म्हटले आहे की, प्रादेशिक सार्वभौमत्व व सुरक्षा यांचे रक्षण करणे हे आमचे काम आहे. त्याचबरोबर सीमेवर शांतता व स्थिरतेचे वातावरण निर्माण केले जाईल. दोन्ही देशात सीमेवरील परिस्थिती स्थिर व नियंत्रणात आहे. सीमेवर ज्या हालचाली होत असतात त्यातील वादांचे निराकरण करण्यासाठी दोन्ही देशात संवाद यंत्रणा आहे. त्यातून सल्लामसलतीने हे प्रश्न सुटू शकतात. भारताशी चर्चा चालू आहे का असे विचारले असता झाओ यांनी सांगितले की, दोन्ही देशांत सीमा प्रश्नावरील मुद्दे व इतर गोष्टींसाठी संवाद व राजनैतिक यंत्रणा आहेत.

भारत व चीन यांच्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ३५०० कि. मी.ची असून लडाख, उत्तर सिक्कीम या भागात भारत व चीन यांनी लष्करी जवान वाढवून शक्तिप्रदर्शन केले होते. त्यामुळे तणावाचे वातावरण गेल्या दोन आठवडय़ांपासून आहे. लडाख व सिक्कीम भागात  भारतीय जवानांच्या नेहमीच्या गस्त कार्यक्रमात चीनचे सैन्य अडथळा आणीत आहे, असे भारताने म्हटले असून भारतीय सैन्याने चिनी हद्दीत घुसखोरी केल्याचा चीनचा आरोप फेटाळला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, आम्ही चीनच्या हद्दीत घुसखोरी केलेली नाही. आमची भूमिका जबाबदारीची असून भारतही सुरक्षा व सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी नेहमीच सज्ज आहे. भारतीय लष्कराने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे पश्चिम भागात उल्लंघन केल्याचा आरोप चुकीचा आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button