breaking-newsआंतरराष्टीय

सिनेटने केले डोनाल्ड ट्रम्प यांना दोषमुक्त

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या महाभियोगाच्या कारवाईतून रिपब्लिकन सदस्यांचे वर्चस्व असलेल्या सिनेटने त्यांची सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्तता केली आहे. महाभियोगाच्या कारवाईकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले होते. सिनेटच्या निर्णयामुळे ट्रम्पविरोधकांना जोरदार धक्का बसला असून अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वर्षांतच ट्रम्प यांनी मोठा राजकीय विजय मिळविला आहे.सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाने ५२ विरुद्ध ४८ मताधिक्याने ट्रम्प यांच्यावरील आरोप फेटाळून लावले. त्याचप्रमाणे काँग्रेसच्या कामात अडथळे आणण्याच्या आरोपातून सिनेटने ट्रम्प यांची ५३ विरुद्ध ४७ मतांनी निर्दोष मुक्तता केलेली आहे.

सत्तेचा गैरवापर करणे आणि काँग्रेसच्या कामात अडथळे आणणे असे दोन आरोप डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर करण्यात आले होते. ट्रम्प यांनी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्यावर दबाव आणून त्यांना अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीतील संभाव्य प्रतिस्पर्धी जो बिदेन यांच्या युक्रेनमधील व्यवहारांची चौकशी करण्यास सांगितले आणि त्यासाठी त्यांनी सत्तेचा गैरवापर केला, असा पहिला आरोप आहे. तर प्रतिनिधीगृहात या प्रकरणी महाभियोग चौकशी सुरू असताना व्हाइट हाऊसचे अधिकारी आणि अन्य सहकाऱ्यांना समितीसमोर साक्ष देण्यापासून रोखून पुरावे गोळा करण्यात बाधा निर्माण केल्याचा ट्रम्प यांच्यावर दुसरा आरोप आहे. ट्रम्प यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली असली तरी ते महाभियोग कारवाईला सामोरे गेलेले आणि पुन्हा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला सामोरे जाणारे पहिले अध्यक्ष ठरणार आहेत. ट्रम्प यांना पदावरून दूर करण्यासाठी दोनतृतीयांश मतांची गरज होती, मात्र १०० सदस्यांच्या सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाचे ५३ सदस्यांसह वर्चस्व असल्याने ट्रम्प यांना पदावरून दूर करणे शक्य नसल्याचे आधीपासूनच स्पष्ट होते. रिपब्लिकन पक्षाचे सिनेट सदस्य मिट रोमनी हे ट्रम्प यांच्यावर टीका करणारे म्हणून ओळखले जातात. त्यांनी पहिल्या आरोपाबद्दल ट्रम्प यांच्या विरोधात मतदान केले, मात्र दुसऱ्या आरोपाबाबत त्यांनी पक्षाचीच भूमिका स्वीकारली. उर्वरित सदस्यांनी पक्षाच्या भूमिकेप्रमाणे मतदान केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button