breaking-newsक्रिडा

सिंगापूर ओपन बॅडमिंटन: ऋतुपर्णा, ऋत्विका, शुभंकर दुसऱ्या फेरीत पराभूत

  • सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धा

सिंगापूर: राष्ट्रीय विजेती ऋतुपर्णा दास, ऋत्विका शिवानी गड्डे आणि शुभंकर डे या युवा भारतीयांचे आव्हान दुसऱ्या फेरीत संपुष्टात आल्यामुळे सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेचा आजचा दिवस भारतासाठी अपयशाचा ठरला. तसेच सात्विकसाईराज रॅंकिरेड्डी व अश्‍विनी पोनप्पा आणि प्रणव जेरी चोप्रा व सिक्‍की रेड्डी या भारतीय जोड्यांनाही मिश्र दुहेरीतील दुसऱ्याच फेरीत पराभव पत्करावा लागला.

तैपेई चीनच्या अग्रमानांकित चोऊ तिएन चेन याने शुभंकर डे याचा 21-13, 21-14 असा केवळ 33 मिनिटांत एकतर्फी पराभव करताना पुरुष एकेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत धडक मारली. महिला एकेरीत इंडोनेशियाच्या युलिया सुसांतोने राष्ट्रीय विजेत्या ऋतुपर्णा दासचा 15-21, 21-13, 21-16 असा 59 मिनिटांत पराभव करताना उपान्त्यपूर्व फेरी गाठली.

महिला एकेरीतील आणखी एका लढतीत जपानच्या पाचव्या मानांकित सायाका ताकाहाशीने ऋत्विका सिवानी गड्डेचा 21-8, 21-15 असा केवळ 26 मिनिटांत पराभ” करताना अखेरच्या आठ खेळाडूंमध्ये स्थान मिळविले. मिश्र दुहेरीत ली चुन हेई व चाऊ होई वाह या हॉंगकॉंगच्या जोडीने सात्विकसाईराज रॅंकिरेड्डी व अश्‍विनी पोनप्पा यांचा प्रतिकार 21-14, 16-21, 21-14 असा 53 मिनिटांत संपुष्टात आणला. तसेच चॅंग ताक चिंग व एनजी विंग युंग या हॉंगकॉंगच्या बिगरमानांकित जोडीने प्रणव जेरी चोप्रा व सिक्‍की रेड्डी या आठव्या मानांकित भारतीय जोडीचा 21-15, 21-11 असा 25 मिनिटांत फडशा पाडताना उपान्त्यपूर्व फेरीत धडक मारली.

तत्पूर्वी भारताचा गतविजेता बी. साई प्रणीथ पहिल्याच फेरीत पराभूत झाला. जपानच्या बिगरमानांकित यु इगाराशीने साई प्रणीथचे आव्हान मोडून काढताना खळबळजनक निकालाची नोंद केली. तसेच माजी राष्ट्रकुल कांस्यविजेता गुरुसाई दत्त व वैष्णवी रेड्डी या भारतीय खेळाडूंनाही सलामीच्याच फेरीत पराभवाचा धक्‍का बसला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button