breaking-newsक्रिडा

देशांतर्गत क्रिकेट मोसमात दोन हजारांपेक्षा अधिक सामने

पंच, गुणलेखकांची कमतरता भासणार

नवी दिल्ली: ईशान्येकडील राज्यांचा संघटनेत समावेश झाल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) आगामी देशांतर्गत मोसमामधील सामन्यांची संख्या दोन हजारांच्या पुढे गेली आहे. मात्र या भरगच्च वेळापत्रकासाठी पंच, गुणलेखक, सामनाधिकारी, अन्य तांत्रिक मनुष्यबळ तसेच साहित्य व उपकरणांचीही कमतरता भासणार असल्याने बीसीसीआयला अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

यंदाच्या सत्रापासून भारताच्या देशांतर्गत मोसमात मणिपूर, मेघालय, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, नागालॅंड, उत्तराखंड आणि बिहार या संघांचा समावेश झाला आहे. त्यामुळे वरिष्ठ पुरुष आणि महिला स्तरापासून 16 वर्षांखालील (मुले-मुली) स्तरापर्यंतच्या स्पर्धांतील सामन्यांची संख्याही वाढून 2017 पर्यंत गेली आहे. 13 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या महिला चॅलेंजर ट्रॉफी स्पर्धेपासून देशांतर्गत मोसमाला सुरुवात होईल.

सर्वोच्च न्यायालयाने नियुक्‍त केलेल्या लोढा समितीच्या शिफारशींनुसार आगामी स्थानिक क्रिकेट मोसमातील विविध वयोगटांतील स्पर्धांमध्ये ईशान्येकडील राज्यांना सामावून घेण्यात आले आहे. त्या संघांचा रणजी प्लेट स्तरापासून वन-डे व टी-20 स्पर्धांतही सहभाग राहील. बीसीसीआयने 2018-19 मोसमाचा कार्यक्रम जाहीर केला असून महिला टी-20 चॅलेंजर स्पर्धेनंतर पुरुषांची दुलीप करंडक स्पर्धा होणार आहे.

रणजी करंडक स्पर्धेत 37 संघांचा समावेश असून नव्याने समाविष्ट केलेल्या अरुणाचल प्रदेश, बिहार, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालॅंड, पुडुचेरी, सिक्‍कीम व उत्तराखंड या नऊ संघांना प्लेट विभागात स्थान मिळाले आहे. प्लेट विभागातील पहिले दोन क्रमांक मिळविणाऱ्या संघांना अव्वल श्रेणी “क’ विभागात स्थान मिळेल. या विभागातील पहिल्या दोन संघांना अनुक्रमे अव्वल श्रेणी “अ’ आणि “ब’ विभागात स्थान देण्यात येईल. अव्वल श्रेणीतील “अ’ आणि “ब’ विभागात प्रत्येकी दहा संघांचा समावेश आहे.

नवीन वेळापत्रकानुसार रणजी स्पर्धा ही 1 नोव्हेंबर 2018 ते 6 फेब्रुवारी 2019 या कालावधीत होणार आहे. त्यात एकूण 160 सामने खेळले जाणार आहेत. तर टी-20 सय्यद मुश्‍ताक अली चषक स्पर्धेत 140 सामने होणार आहेत. पुरुषांच्या 23 वर्षांखालील गटांत 302, तर महिला विभागात 292 सामने होतील. वरिष्ठ महिलांच्या गटांत 295 सामने, तर 19 वर्षांखालील युवकांच्या गटांत 286 सामने होतील.

यावेळी रणजी करंडक स्पर्धेने मोसमाचा प्रारंभ करण्याच्या परंपरेत बदल करत दुलीप करंडक स्पर्धेने मोसमाची सुरुवात केली जाणार आहे. त्यानंतर हजारे व देवधर करंडक स्पर्धा होतील. त्यापाठोपाठ रणजी स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. मुश्‍ताक अली टी-20 स्पर्धेत 37 संघ असतील. त्याचबरोबर ज्युनिअर व युवा खेळाडूंसाठी कर्नल सी.के.नायडू, विनू मांकड, कूचबिहार, विझी या स्पर्धा होतील त्यामुळे स्थानिक खेळाडूंना आयपीएलसाठी संधी मिळेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button