breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

सायन रुग्णालयात दोन मृतदेहांची अदलाबदल झाल्याप्रकरणी आधी डॉक्टर आणि आज आणखी दोन कर्मचारी निलंबित

सायन रुग्णालयात दोन मृतदेहांची अदलाबदल झाल्याप्रकरणी काल रात्री म्हणजे 13 सप्टेंबरला दोन डॉक्टरांना निलंबित करण्यात आले होते. तर आज पुन्हा आणखी दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. शवागारातील २ कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले असून या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली आहे. अशा चुकांचे महानगरपालिका प्रशासन मुळीच समर्थन करीत नसून या दुर्दैवी प्रकारात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. दरम्यान, मृत व्यक्तिचे शवविच्छेदन करताना किडनी काढण्यात आल्याचा आरोप चुकीचा असून प्रशासन तो स्पष्टपणे नाकारत आहे, असा खुलासा मुंबई महापालिकेने केला आहे.

सायन येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वोपचार रुग्णालयात अंकुश सुरवडे (वय २६) याला २८ ऑगस्ट रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. एका अपघातात जबर जखमी झाल्याने अंकुश सुरवडे याच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्याला जीवरक्षक प्रणालीसह उपचार पुरवण्यात येते होते. दुर्दैवाने अंकुशचे काल सकाळी निधन झाले. त्यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

दरम्यान, शीव रुग्णालयातच हेमंत दिगंबर यांना शनिवार, १२ सप्टेंबर रोजी मृतावस्थेतच त्यांच्या नातेवाईकांनी आणले होते. अंकुश व हेमंत या दोन्ही रुग्णांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर दोन्ही मृतदेह रुग्णालयाच्या शवागारात राखण्यात आले होते. अंकुशच्या नातेवाईकांनी काल सकाळीच रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधून कळवले की, दुपारी ४ वाजेच्या सुमारास येऊन ते अंकुशचा मृतदेह ताब्यात घेतील. दरम्यानच्या कालावधीत हेमंत यांचे नातेवाईक रुग्णालयात आले. त्यांनी अंकुश यांचा मृतदेह हा हेमंत यांचा असल्याचे ओळखून सर्व प्रक्रिया पार पाडून पोलीसांच्या स्वाक्षरीनंतर नेला. प्रत्यक्षात अंकुश यांचा मृतदेह हा हेमंत यांचा असल्याचे समजून हेमंत यांच्या कुटुंबीयांना सोपवण्यात आला. हेमंत यांच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर अंत्यसंस्काराचे विधीदेखील पार पाडले, असं पालिकने स्पष्ट केलं.

त्यानंतर अंकुशचे नातेवाईक रुग्णालयात आले व त्यांनी शव ताब्यात देण्याची विनंती केल्यानंतर ही चूक घडल्याचे लक्षात आले. या प्रकारामुळे अंकुश यांच्या नातेवाईकांनी रोष व्यक्त केला. पोलीस प्रशासनही रुग्णालयात आले. घडल्या चुकीमुळे एकंदर परिस्थिती हाताबाहेर जावू नये, यासाठी प्रयत्न करण्यात आले. मृतदेह अदलाबदल होण्याचा प्रकार हा दुर्दैवी असून त्याचे कोणत्याही प्रकारे महानगरपालिका प्रशासन मुळीच समर्थन करत नाही. घडलेल्या चुकीबाबत प्रशासन दिलगीर आहे. या घटनेतील चुकीबद्दल शवागारातील संबंधित दोन कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. तसेच या प्रकाराची चौकशी सुरु करण्यात आली आहे. चौकशीअंती दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. तथापि, शवविच्छेदन करताना मयतांचे किडनी करण्यात आल्याचा आरोप मात्र अयोग्य असून हा आरोप प्रशासन नाकारत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button