breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

सगळे कसे समसमान पाहिजे!

शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात मुख्यमंत्र्यांसमोर उद्धव ठाकरे यांची भूमिका

मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची मने जुळली असून राज्यात पुन्हा युतीची सत्ता आल्यावर मुख्यमंत्रीपदाचे काय या गोंधळात न पडता भगव्याची सत्ता आणण्यासाठी सज्ज व्हा, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरात सूर मिसळताना सगळे कसे समसमान पाहिजे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शिवसेनेची आकांक्षा फडणवीस यांच्यासमोर पुन्हा व्यक्त केली.

शिवसेनेचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम षण्मुखानंद सभागृहात बुधवारी झाला. प्रथमच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने दुसऱ्या पक्षाच्या नेत्यास प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आले होते. शिवसेनेचे नूतन खासदार, मंत्र्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. भावना गवळी व प्रतापराव जाधव यावेळी गैरहजर होते.

बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद, मोठे भाऊ  उद्धव ठाकरे यांचे प्रेम व शिवसैनिकांची ऊर्जा घेण्यासाठी या कार्यक्रमात आलो, अशा शब्दांत भाषणाची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच शिवसेना वर्धिष्णु होवो, अशा शुभेच्छाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. मधल्या काळात युतीमध्ये तणाव होता. दोन भावांमध्ये तो होत असतो. मात्र आता लोकसभा निवडणुकीत दोन्ही भाऊ  पुन्हा एकत्र आले. राज्यात व देशात अभूतपूर्व यश मिळवले आहे. त्यामुळे वाघ आणि सिंहाची जोडी एकत्र आली की राज्य कोण करणार हे ठरलेले असते, असे सांगत विरोधकांना आता राज्यात सत्तेची संधी नसल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

लोकसभेप्रमाणे विधानसभेतही अभूतपूर्व यश मिळवण्यासाठी सज्ज व्हा. मुख्यमंत्री कोण याची चर्चा व्यर्थ आहे. आपण भगव्यासाठी लढणारे आहोत हे लक्षात ठेवा, असा संदेश देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात दिला.

त्यानंतर आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीला मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सुरात सूर मिसळला. युती झाली त्यामुळे मैदान साफ झाले असे नाही. मैदान मोकळे असले की तंगडीत तंगडी अडकण्याचा धोका असतो, असा इशाराही उद्धव यांनी दिला. आता दौडू एक साथ हे लक्षात ठेवा. एकमेकांत भांडून माती होऊ  द्यायची नाही. त्यामुळे पुढे काय करायचे हे आमचे व फडणवीसांचे ठरले आहे. कसलाही तंटा होणार नाही, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. मात्र त्याचबरोबर सगळेच कसे समसमान पाहिजे, असे विधान करत राज्यात पुन्हा युतीची सत्ता आल्यावर शिवसेनेला मुख्यमंत्रीपद समान कालावधीसाठी हवे आहे, असे संकेत उद्धव यांनी पुन्हा दिले. शिवसैनिकांनी टाळ्या वाजवून उद्धव यांच्या भूमिकेला साथ दिली.

लोकसभा निवडणुकीत सावरकर यांना डरपोक म्हणणाऱ्यांचा पराभव झाला, राष्ट्रद्रोहाचे कलम रद्द करण्यासाठी निघालेल्यांचा पराभव झाल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी आनंद व्यक्त केला.

विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत विजयी झालेले मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात शिवसेनेत  प्रवेश केला.

आढळराव पाटील उपनेतेपदी

शिरूर लोकसभा मतदारसंघात पराभव झालेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेचे उपनेते म्हणून नियुक्ती या कार्यक्रमात जाहीर करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button