breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सांगली-मिरज- कुपवाड महापालिका निवडणुक ; 78 जागेसाठी 450 उमेदवार रिंगणात

सर्वच पक्षातील नाराज कार्यकर्त्यांची बंडखोरी ; अनेक प्रभागात चाैरंगी लढती 
सांगली (अभिषेक साळुंखे) –  सांगली-मिरज-कुपवाड  महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मंगळवारी अखेरच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षातील प्रमुख बंडखोर उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज कायम ठेवले. त्यामुळे अनेक प्रभागात चौरंगी, तर अनेक प्रभागात पंचरंगी लढत होणार आहे. उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी बंडखोरी रोखण्यासाठी संबंधित उमेदवारांची मनधरणी केली. मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. यात सर्वाधिक बंडखोरी महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेसअंतर्गतच झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी अपक्षांसह सुमारे ३५० उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज काढून घेतले. त्यामुळे महापालिकेच्या ७८ जागांसाठी ४५० उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत.
महापालिका निवडणुकीसाठी दि. १ ऑगस्ट रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी, भारतीय जनता पक्ष व शिवसेना या तीन प्रमुख राजकीय पक्षात काट्याची लढत होणार आहे. याशिवाय सांगली जिल्हा सुधार समिती, स्वाभिमानी विकास आघाडी, आम आदमी पार्टी व  काँग्रेसमधील बंडखोर उमेदवारांची अपक्ष आघाडी यांनीही काही प्रभागात उमेदवार उभे करुन आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी अपक्षांसह ३५० उमेदवारांनी माघार घेतल्याने ७८ जागांसाठी ४५० उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहिले आहेत. या निवडणुकीसाठी तब्बल एक हजार १२८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र उमेदवारी अर्ज छाननीत सुमारे १५३ अर्ज अवैध ठरले होते. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती.
सर्वाधिक बंडखोर उमेदवार हे काँग्रेसमधील आहेत. या सर्वांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विश्वजित कदम, काँग्रेस नेत्या श्रीमती जयश्री मदन पाटील, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील व वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांची धावपळ सुरु होती. मात्र या नेत्यांच्या फारसे काही हाती लागले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष सुरेश पाटील, सांगली शहर जिल्हा अध्यक्ष संजय बजाज, सांगली विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष कमलाकर पाटील व श्रीनिवास पाटील, भाजपच्यावतीने आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील व माजी उपमहापौर शेखर इनामदार यांनी बंडखोर उमेदवारांची समजूत काढून त्यांना माघार घ्यायला लावले.
सांगली शहरात सर्वात चर्चेची ठरलेली काँग्रेसचे नगरसेवक राजेश नाईक यांची बंडखोरी त्यांनी कायम ठेवली. विश्वजित कदम यांनी राजेश नाईक यांची स्वतः भेट घेऊनही त्यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला. परिणामी, प्रभाग क्रमांक १६ मध्ये काँग्रेसचे उमेदवार महापौर हारुण शिकलगार यांच्यासमोर त्यांचे तगडे आव्हान असणार आहे. याशिवाय याच प्रभागात सामाजिक कार्यकर्ते आसिफ बावा यांनीही आपला उमेदवारी अर्ज ठेवल्याने या प्रभागात चुरशीची तिरंगी लढत पहायला मिळणार आहे. या प्रभागात राजेश नाईक व आसिफ बावा हे दोघेही अपक्ष उमेदवारांचे पॅनेल करुन निवडणुकीला सामोरे जात आहेत.
अशीच परिस्थिती प्रभाग क्रमांक नऊमध्ये झाली आहे. काँग्रेसचे उमेदवार नगरसेवक संतोष पाटील यांच्याविरोधात काँग्रेसचे नेते माजी मंत्री स्वर्गीय मदन पाटील यांचे निष्ठावंत कार्यकर्ते अतुल माने यांनी बंडाचा झेंडा खांद्यावर घेतला असून काँग्रेस उमेदवारांविरोधात स्वतःचे पॅनेल उभे केले आहे. त्यात अतुल माने यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे भूपाल उर्फ बंडू सरगर, वृषाली पाटील व रियाज कुरणे यांचा सहभाग आहे. प्रभाग क्रमांक दहामधून भाजपचे नरेंद्र तोष्णीवाल, काँग्रेसच्या प्रियांका मिरासदार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका माधुरी कलगुटगी व काँग्रेसचे अशोक मासाळे यांनी बंडखोरी करुन काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. याच प्रभागात विक्रमसिंह वाघमोडे, अशोक माने व शारदा डिगे यांच्यासह अन्य एक उमेदवार राजेश नाईक यांच्या अपक्ष आघाडीतून निवडणुकीला सामोरे जात आहेत.
प्रतीक पाटील व विशाल पाटील या बंधूंचा बालेकिल्ला असलेल्या प्रभाग क्रमांक ११ मधून मदन पाटील युवा मंचचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष आनंदा लेंगरे यांनी बंडखोरी केली आहे. त्यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक शीतल पाटील, विलास सर्जे व काँग्रेसचे माजी नगरसेवक सुभाष गोयकर यांनीही आपापले उमेदवारी अर्ज ठेवले आहेत. त्यामुळे या प्रभागातही मोठी चुरशीची लढत बघायला मिळणार आहे. प्रभाग क्रमांक १९ मधून काँग्रेसचे महेश कर्णी, अलका एेवळे, अनिता आलदर व अजय देशमुख यांनी एकत्र येऊन स्वतंत्र पॅनेल केले आहे. दिनकर पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या सांगलीवाडी परिसरातील प्रभाग क्रमांक १३ मधून त्यांचे पुतणे उमेश पाटील यांनीही बंडखोरी कायम ठेवल्याने या प्रभागात चौरंगी लढत होत आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button