breaking-newsपुणेमहाराष्ट्र

न नापास धोरण राज्यांनी रद्द करु नये

अनुत्तीर्णतेच्या निर्णयाबाबत शिक्षणतज्ज्ञांची नाराजी: तर शिक्षक व पालकवर्ग आनंदात

पुणे,- विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली ते आठवीमध्ये उत्तीर्ण अनुतीर्ण करावे की नाही याबाबत गेल्या काही वर्षात मोठी चर्चा झाली. अखेर याबाबत लोकसभेत शिक्षण हक्क कायद्यात बदल करत पहिली ते आठवीचे अनुत्तीर्ण न करण्याचे धोरण बदलले आणि ही चर्चा पुन्हा सुरु झाली. आता राज्यांच्या कोर्टात हा चेंडू गेला असून राज्य सरकाच्या निर्णयाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
याबाबत दैनिक प्रभातने शिक्षणतज्ज्ञांबरोबरच सामान्यांची व शिक्षकांची मतेही जाणून घेतली. यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असल्याचे दिसून आले. शिक्षणाला पास नापास या संकुचित धोरणात बसवू नका असे मत शिक्षणतज्ज्ञांनी मांडले तर पास नापासची चाळण प्रत्येक पायरीवर लावा तरच मूल जगाच्या स्पर्धेत टिकेल असा अर्थभाव पालक व शिक्षकांच्या दृष्टीकोनातून दिसला.

एखाद्या चांगल्या धोरणाची अंमलबजावणी करणाऱ्या घटकांच्या नाकर्तेपणामुळे, भ्रष्ट आचरणामुळे नीट होत नसेल तर ते धोरणच रद्द करणे यासारखा दुर्दैवी प्रकार असू शकत नाही. आपल्या याच दुर्गुणांपुढे हतबल होऊन यापूर्वी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाच्या धोरणाचा बळी गेला; आता कुऱ्हाड न नापास धोरणावर पडली आहे. हे कोणाच्या लहरीखातर ठरलेले धोरण नव्हते; तर ते आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरांवरील अनेक अभ्यासांतून पुढे आले होते. भारतात कोठारी आयोग, 1986चे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि इतर अनेक ठिकाणी याच धोरणाच्या अंमलबजावणीची शिफारस केलेली आहे. शैक्षणिकदृष्ट्या अप्रगत असलेले देश या धोरणाची अंमलबजावणी करत नाहीत म्हणून प्रगत झाले आणि प्रगत देश त्याची अंमलबजावणी करतात म्हणून त्यांची अधोगती झाली असे घडल्याचे दिसत नाही. महाराष्ट्र शासनाने कायद्यात असलेल्या स्वातंत्र्याचा वापर करून ही सुधारणा अमलात न आणण्याचा सुज्ञपणा दाखवावा एवढीच अपेक्षा करणे आता आपल्या हातात आहे.
वसंत काळपांडे, शिक्षणतज्ज्ञ

शिक्षणाचा मूळ उद्देश मुलांना उत्तम नागरिक बनविणे, त्यांना शिकवणे, विकास करणे या प्रक्रिया शिक्षणातून अपेक्षित आहेत. त्यांना पास नापास ठरविणे नाही. केंद्राचे काही निर्णय घेऊन राज्याकडे आता पुढील कार्यवाहीची जबाबदारी टाकली आहे. पुढील कार्यवाहीसाठी राज्य सरकारने शैक्षणिक तत्त्वज्ञान प्रक्रियेचा नीट विचार करावा व आहे तेच धोरण सुरु ठेवावे. केवळ कार्यवाही प्रभावशाली कशी होईल याकडे लक्ष द्यावे. कार्यवाहीच्या पातळीवर आपण उणे पातळीवर आहोत. त्यामुळे हे सर्व प्रश्‍न निर्माण झाले आहेत. पास करण्यातही खोटी व चुकीची माहिती देऊन पास केले जातात हे आरोप पुर्वी आपल्या जमेस आहेत.
अ.ल.देशमुख, शिक्षणतज्ज्ञ

परीक्षा नाही म्हटलं की मुलं अभ्यासच करायची नाहीत. त्यामुळे न नापासचे धोरण चांगले धोरण आहे. आता परत पुर्वीप्रमाणे दिवस येतील असे वाटते आहे. मुलं अभ्यास करायला लागतील.
जयश्री शिंदे, मुख्याध्यापिका
रेणुका स्वरुप प्रशाला

परीक्षा नसतील तर मुलांना कश्‍याचाच धाक रहात नाही. परीक्षेच्या निमित्ताने मुले अभ्यास तरी करतात. ज्या त्या वेळी कच्चा राहिलेला अभ्यास त्या त्या वेळीच नापास पास मधून कळला तर पुढे मुलांना अवघड जात नाही. अन्यथा आठवीनंतर अनेक मुलं नापास होतात व पुढे त्यांचे शिक्षणच थांबते.
रेणूका मानकर, पालक

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button