breaking-newsराष्ट्रिय

सलाम! काश्मीरमध्ये जवानांनी बर्फवृष्टीत गर्भवतीसह वाचवले जुळ्यांचे प्राण

काश्मीरमध्ये भारतीय जवान कोणत्या परिस्थितीत देशाचे संरक्षण करत असतात हे आपल्याला माहित आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत देशाचे रक्षण करण्यासाठी ते प्राणाची बाजी लावत असतात. या जवानांनी आपली मान आणखी उंचावेल असे काम केले आहे. या जवानांनी उत्तर काश्मीरमधील बंदिपोरा येथील एका गर्भवती महिलेचे प्राण वाचवले आहे. इतकेच नाही तर जवानांच्या या तत्परतेमुळे या महिलेने दोन गोंडस जुळ्यांना जन्मही दिला आहे. बर्फवृष्टी होत असताना या महिलेला स्ट्रेचरवरुन अडीच किलोमीटर घेऊन जात या जवानांनी नागरिकांप्रती असलेले कर्तव्य दाखवून दिले आहे. या महिलेला बर्फातून बंदिपोरा येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यास या जवानांना यश आले आहे.

अवघड परिस्थितीत गावकऱ्यांनी मागितलेल्या मदतीच्या हाकेला ओ देत जवानांनी पुन्हा एकदा आपली तत्परता दाखवून दिली आहे. मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत असल्याने उत्तर काश्मीरमधील सर्व रस्ते बर्फाने भरले होते. त्यामुळे या रस्त्यांवरील दळणवळण जवळपास बंद झाली होती. याचवेळी गुलशना बेगम यांना प्रसूती कळा सुरु झाल्या. लष्कराकडे मदतीसाठी संपर्क केल्यानंतर राष्ट्रीय रायफलचे जवान याठिकाणी पोहोचले.

महिलेची अवस्था आणि त्यावेळी तातडीने मदतीची असणारी गरज लक्षात घेऊन आम्ही हे काम केल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले. याठिकाणी लष्कराने स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधून जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांना घटना कळवली होती. गर्भवती महिलेची तपासणी केल्यानंतर तिच्या पोटात जुळे असल्याचे समजले आणि तिला सिझेरियनसाठी श्रीनगर रुग्णालयात नेण्यात आले. याठिकाणी तिने अतिशय गोंडस अशा दोन जुळ्या मुलींना जन्म दिल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले. त्यामुळे प्रसंगावधान राखून मदतीचा हात पुढे करणाऱ्या लष्करातील जवानांकडून आपणही प्रेरणा घ्यायला हवी यात शंका नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button