breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

संभाजी ब्रिगेडच्या वतीने राष्ट्रसंत गाडगे महाराजांचा स्मृती दिन साजरा

पिंपरी / महाईन्यूज

संभाजी ब्रिगेडच्या वतीने राष्ट्रसंत गाडगे महाराजांचा स्मृती दिन थेरगाव येथील संभाजी ब्रिगेडच्या कार्यालयात साजरा करण्यात आला. 

यावेळी संत गाडगेबाबांच्या प्रतिमेला संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष गणेश दहिभाते जिल्हा संघटक ज्ञानेश्वर लोभे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतीश काळे यांनी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचा जीवन प्रवास उलगडताना आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, गाडगे महाराज यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी झाला. ईश्वर कशात आहे हि नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब दीनदलित यांचा सामाजिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी तसेच अज्ञान अंधश्रद्धा अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी.. या संत तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे जीवन प्रवास करून समाजातील दीन दुबळे अनाथ अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी पुराणे मंत्र-तंत्र, देवदेवस्की चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका, अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली.

 माणसात देव शोधणार्‍या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा  अनाथालये आश्रम  व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. त्यांच्यामध्येच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसर्‍या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसर्‍या हातात मडके आशा साध्या वेशात त्यांनी लोकांची सेवा केली. 

लोकसेवेच्या याच धकाधकीच्या प्रवासातच त्यांचे अमरावती जवळ वलगाव येथे पेढी नदीच्या पुलाजवळ २० डिंसेंबर १९५६ रोजी देहावसान झाले. ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ या भजनाचा प्रसार करणार्‍या, कर्मयोगावर दृढ श्रद्धा असणार्‍या या सत्पुरुषाची आणि कर्त्या समाजसुधारकाची समाधी अमरावती येथे आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

आभार परमेश्वर जगताप यांनी मानले. यावेळी विनोद घोडके, सतिश पवार, बालाजी जाधव, सुजीत येळवंडे, विक्रम जुगधर, विशाल पाटील इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button