breaking-newsपिंपरी / चिंचवड

संभाजी ब्रिगेडचे सतिश काळे यांना पोलिसांच्या शंभर नोटिसा, मराठा जोडो अभियानकडून सत्कार

सामाजिक आंदोलने करत असताना पोलिस प्रशासनाच्या नोटीसांचे शतक पुर्ण झाल्याबद्दल केला विशेष सत्कार

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष सतिश काळे यांना सामाजिक आंदोलनामुळे पोलिसांकडून शंभरावी नोटिस देण्यात आली होती. या निमीत्ताने मराठा जोडो अभियान महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने सतिश काळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या प्रसंगी प्रदेश अध्यक्ष नितीन जाधव, प्रदेश संघटक गजानन वाघमोडे, जिल्हा कार्याध्यक्ष रुषीकेश कदम यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतिश काळे यांना ( फौजदारी दंड प्रक्रीया संहिता १९७३ चे कलम १४९ अन्वयेची नोटीस) विविध सामाजिक आंदोलने करत असताना पोलीस प्रशासनाची तब्बल शंभरावी नोटिस पोलिस प्रशासनाकडून बजावण्यात आलेली होती. याचीच दखल घेत मराठा जोडो अभियान या संघटनेच्या वतीने तुळापूर येथील कार्यालयांमध्ये मराठा जोडो अभियान या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उद्धव शिवले यांच्या हस्ते राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांची प्रतिमा, राष्ट्रसंत तुकाराम महाराजांची गाथा, महापुरुषांची चरित्रे, पगडी, शाल, श्रीफळ देऊन काळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून जिजाऊ वंदना म्हणून शासनाच्या नियमांचे पालन करीत मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पाडण्यात आला. काळे यांच्या कार्याबाबत संघटनेतील विविध पदाधिकार्यांनी मत व्यक्त करत त्यांच्या कार्याचा गौरव केला.

मराठा जोडो अभियानाचे उध्दव शिवले यांनी काळे यांच्या सामाजिक आंदोलनांबाबत विवीध आठवणींना उजाळा दिला, ते म्हणाले सतिश काळे हे गेल्या चौदा वर्षांपासून संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी सुरुवातीपासूनच संघटनेत अनेक आक्रमक आंदोलने केलेली आहेत. यामध्ये प्रामुख्याने मराठा आरक्षणासाठी शिवनेरी किल्ल्यावर मा.मुख्यमंत्र्यांच्या हेलीकॉप्टर वरती झालेली दगडफेक असो किंवा मराठा आरक्षणासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावरुन उडी मारुन आत्मबलिदान देण्याचे आंदोलन असेल. या आंदोलनाच्या वेळी सतिश काळे व त्यांच्या सहकार्यांना पोलिसांकडून अटक करीत त्यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. अशा विवीध तीव्र आंदोलनांमधून काळे यांनी समाजाच्या भावना या शासनापर्यंत पोचवण्याचे काम केलेले आहे.

पुणे येथील लाल महालातील दादु कोंडदेव पुतळा काढण्याच्या आंदोलन लढ्यात सतिश काळे यांचा सक्रीय सहभाग होता, तसेच शेतकर्यांच्या शेतमालाला हमी भाव मिळावा यासाठी मुंबई येथे मंत्रालयाच्या गेटवर धान्य उधळुण आंदोलन केले होते. शेतकर्यांचा दुधाला योग्य अनुदान मिळावे यासाठी अनेकदा मुंडन आंदोलन, रास्ता रोको आंदोलनं, शाळांकडून विद्यार्थ्यांकडून उकळण्यात येणारे वाढीव शैक्षणिक शुल्का विरोधातील आंदोलन. तसेच २०११ सालापासून संभाजी बिडी चे नाव बदलावे तसेच बिडी बंडल वरील छत्रपती संभाजी महाराजांचा फोटो काढून टाकण्यात यावा, यासाठी काळे यांनी अनेक आंदोलने केलेली आहेत. २०१३ साली साबळे आणि वाघिरे कंपनीने बिडी बंडल वरुन छत्रपती संभाजी महाराजांचा फोटो काढून टाकला होता व आता १० सप्टेंबर २०२० रोजी कंपनीने पत्रकार परिषद घेऊन संभाजी बिडी चे नाव बदलण्याचा निर्णय जाहीर केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बदनामीकारक खोडसाळ व्हिडीओ प्रसारीत केल्याप्रकरणी आर्ट ऑफ लिव्हिंग चे श्री श्री रविशंकर यांच्यावर कारवाई होण्या संदर्भात अनेक आंदोलने केली आहेत, तरी देखील अद्यापही रविशंकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

तसेच पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात विठ्ठल जोशी यांचे कडून पांडुरंगाची झालेल्या विटंबना प्रकरणी केलेली अनेक आंदोलने असतील अशा समाजातील विविध सामाजिक विषयावर सतिश काळे हे मराठा व इतर बहुजन समाजामध्ये एकोपा निर्माण करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेऊन समाजकार्य करीत आहेत. सर्वंच जाती धर्मातील बांधवासाठी सामाजिक प्रश्नावर सर्वांच्या पुढे असणारे मराठा बहुजन समाजासाठी अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा कार्यकर्ता म्हणजे सतीश काळे. असे उध्दव शिवले म्हणाले. या सत्कारामुळे सतिश काळे भारावून गेले होते, त्यांनी समाजिक अांदोलनाचा लढा असाच चालू राहील अशी ग्वाही दिली. या कार्यक्रमाची प्रस्तावना योगेश पवार यांनी केली तसेच आभार प्रशांत पाटील यांनी मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button