breaking-newsराष्ट्रिय

संपूर्ण देशात सप्टेंबर महिना ‘पोषण महिना’ म्हणून साजरा होणार

नवी दिल्ली – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी ११ वाजता ‘मन की बात’ या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संपूर्ण सप्टेंबर महिना हा देशभरात ‘पोषण महिना’ म्हणून साजरा केला जाईल, अशी घोषणा केली. ‘राष्ट्र आणि संतुलित आहार यांचा जवळचा संबंध आहे’, असे मोदींनी यावेळी सांगितले.

बालकांच्या आहाराच्या मुद्द्यावर विशेष भर देताना मोदी म्हणाले, ‘गर्भात असताना मुलांना जेवढे चांगले पोषण मिळते तेवढाच त्यांचा मानसिक विकास चांगला होतो. त्यासाठी गर्भवती मातांना चांगले पोषण मिळण्याची गरज आहे. आपण काय खातो, किती खातो, किती वेळा खातो यापेक्षा आपल्याला अन्नातून पोषक तत्त्वे किती मिळतात, लोह, कॅल्शियम, सोडियम, व्हिटॅमिन मिळतात की नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे.’ त्याचबरोबर ‘मुलांच्या प्रगती पुस्तकाप्रमाणेच त्यांच्या आहाराचेही प्रगती पुस्तक बनवायला हवे’, असे सांगून मोदी पुढे म्हणाले, ‘संतुलित आहाराच्या या मोहिमेत लोकांचा सहभाग आवश्यक आहे. गेल्या काही वर्षात देशात या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. विशेषतः आपल्या खेड्यापाड्यांमध्ये लोकसहभागातून याला जनआंदोलनाचे रूप दिले जात आहे. यासाठी शाळा जोडल्या जात आहेत. स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.’

मोदी पुढे म्हणाले, ‘आपला देश विशाल आहे. अन्नधान्याबाबत आपल्या देशात विविधता आहे. आपल्या देशात सहा ऋतूमान आहेत. तेथील हवा व पर्यावरणानुसार वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारचे अन्नधान्य उत्पादित होते. त्यानुसार त्या त्या भागासाठी अनुकूलता लक्षात घेऊन पोषक आहार धोरण बनविणे गरजेचे आहे.

त्याचबरोबर पंतप्रधान मोदींनी यावेळी बोलताना खेळण्यांच्या उद्योगावर भर देण्याचे आवाहन केले आहे. कोरोना काळात मुलं वेळ कसा घालवत असतील? त्यांच्या भवितव्याबाबत मंथन केले असल्याचे मोदी म्हणाले. जगभरात खेळण्यांची मोठी बाजारपेठ आहे. मात्र खेळण्यांच्या या ग्लोबल इंडस्ट्रीत भारताचे योगदान अतिशय कमी असल्याचे ते म्हणाले. भारत आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत पुढे जात असून, भारतातील मुलांना भारतातच तयार केलेली नवीन खेळणी कशी मिळतील यावर विचार सुरू आहे, असेही मोदींनी सांगितले. भारतात खेळण्यांचे अनेक उद्योग समूह आहेत आणि हजारो कारागीर या कामाशी संबंधित आहेत. या उद्योगसमूहांना नाविन्यपूर्ण आणि सर्जनशील उपायांच्या माध्यमातून प्रोत्साहित केले पाहिजे. भारतीय खेळण्यांच्या बाजाराच्या विस्तारास मोठा वाव आहे. आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देऊन या उद्योगात क्रांती होऊ शकते. खेळणी केवळ सांस्कृतिकदृष्ट्या मजबूत करत नाहीत तर खेळण्यांमुळे मुलांमध्ये मानसिक कौशल्यही विकसित होत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा आज ६८वा भाग असून ते दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याच्या कार्यकाळातील १५वा भाग होता. मागीलवेळी २६जुलै रोजीच्या ‘मन की बात’मध्ये त्यांनी कारगिल विजय दिनानिमित्ताने शहीद जवानांच्या पराक्रमाच्या स्मृतीला उजाळा दिला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button