breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘संतपीठ’ निविदा प्रक्रियेतील जादा वाटा कुणाचा?, ठेकेदारावर पालिकेची मेहेरबानी

पिंपरी ( महा ई न्यूज ) – टाळगाव चिखली येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ उभारण्यात येत आहे. त्यासाठी महापालिकेने ४० कोटी रुपयांचा खर्च गृहीत धरला असताना कंत्राटदारांनी जादा दराच्या निविदा भरल्या आहेत. त्यामुळे ४० कोटींच्या कामाला आता पंचेचाळीस कोटी रुपये मोजावे लागणार असून ठेकेदार पोसण्याचा धंदा महापालिकेने मांडला आहे. त्यामुळे जादा वाटा कुणाचा यावरुन तर्कविर्तक लढविले जात आहे. 

भागवत धर्माचा प्रसार व प्रचार व्हावा, वारकरी संप्रदायाचे पारंपरिक शिक्षण मिळावे, याकरिता महापालिका हे ‘संतपीठ’ उभारत आहे.  त्यामुळे टाळगाव चिखली परिसरात पहिले ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ’ उभारण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक १ मधील या संतपीठ उभारणीस १३ मे २०१५ रोजी महापालिका सभेत मान्यता देण्यात आली. त्यानंतर माध्यमिक शाळेसाठी आरक्षित चिखली येथील १ हेक्टर ८० गुंठे जागा महापालिकेला देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली.

या संतपीठामध्ये निवासी स्वरुपाचे, प्राथमिक शाळेपासून ते उच्च पदवीपर्यंतचे केवळ संत साहित्यावर आधारित शिक्षण दिले जाणार आहे. त्याठिकाणी वसतिगृह, सभागृह, अभ्यासवर्ग आदींचा समावेश असणार आहे. शाळेमध्ये सर्वधर्मीय विद्यार्थ्यांना प्रवेश असून, हे संतपीठ मराठी माध्यमातून शिक्षण देणारे असणार आहे. महापालिकेतर्फे उभारण्यात येणारे हे संतपीठ आणि त्या अनुषंगाने शाळा व्यवस्थापनासाठी कंपनी स्थापन करण्यात येणार आहे. संतपीठाच्या इमारत बांधकामासाठी महापालिकेतर्फे ४० कोटी ६१ लाख रुपयांची निविदा मागविण्यात आली.

दरम्यान, बी. के. खोसे यांनी ११.१६ टक्के जादा, व्ही. एम. मातेरे इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड यांनी १४.७० टक्के जादा, तर एस. एस. साठे यांनी १६ टक्के जादा दराने निविदा सादर केल्या. बी. के. खोसे यांनी सादर केलेली वाढीव दराची निविदा स्वीकारण्याचा निर्णय आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतला आहे. त्यानुसार म्हणजेच ४४ कोटी ६१ लाख ७३ हजार ३२३ रुपये अधिक रॉयल्टी चार्जेस ३६ लाख ९२ हजार २६४ आणि मटेरिअल चार्जेस १० लाख ३१ हजार ४७७ रुपये असे एकूण ४५ कोटी ८ लाख ९७ हजार ६४ रुपये इतका खर्च संतपीठ उभारणीसाठी येणार आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button