breaking-newsपुणेमहाराष्ट्र

शहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी- गिरीश महाजन

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणारे जलवाहिनीवरील पंप जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी बंद केल्याचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर शहराच्या पाण्यात कपात करण्यात येणार नाही, अशी भूमिका जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी घेतली. शहराला सध्या प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान पुण्याच्या पाणीपुरवठय़ासंदर्भात शुक्रवारी (२५ जानेवारी) महापालिका आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.

पुण्यात एका कार्यक्रमासाठी आलेले असताना महाजन यांनी ही माहिती दिली. पुण्याला सध्या प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी जलसंपदा विभागाकडून दिले जात आहे. हे पाणी असेच सुरू ठेवण्याचे आदेश सध्या तरी दिलेले आहेत. धरणामध्ये पाण्याचा किती साठा किती आहे याबाबत माहिती घेतलेली आहे. तसेच उन्हाळ्यात शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाणी कशाप्रकारे शिल्लक राहील याबाबत विचार सुरू आहे. जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि महापालिकेचे काही अधिकारी यांची संयुक्त बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. त्या बैठकीत उन्हाळ्यातील पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असे महाजन यांनी सांगितले. कालवा समिती आणि महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाने शहराच्या पाणीपुरवठय़ात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी महापालिका करत नसून जादा पाणी घेत असल्याचा आरोप करत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीवरील पंप बंद करण्याची कारवाई केली होती.

त्यानंतर महापौर मुक्ता टिळक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत शहराच्या पाणीकोटय़ात तूर्त कपात न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button