breaking-newsपुणेमहाराष्ट्र

शहरात उद्यापासून विजेवरील बस

१५ गाडय़ा पुण्यात, तर १० गाडय़ा पिंपरी-चिंचवडमध्ये

पुणे : बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित विजेवर धावणाऱ्या (ईलेक्ट्रीकल बस- ई-बस) २५ गाडय़ांची सेवा उद्यापासून (शनिवार) पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात सुरू होणार आहे. पर्यावरणपूरक अशा या २५ गाडय़ांपैकी १५ गाडय़ा पुणे शहरात तर १० गाडय़ा पिंपरी-चिंचवड शहरात धावणार आहेत. या सर्व गाडय़ा मिडी बस या प्रकारातील आहेत.

स्मार्ट सिटी अंतर्गत पर्यावरणपूरक ई-बस घेण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली होती. त्याअंतर्गत ५०० गाडय़ा खरेदी करण्यात येणार आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात १५० तर दुसऱ्या टप्प्यात ३५० गाडय़ांची खरेदी करण्यास पीएमपीच्या संचालक मंडळाने मान्यता दिली होती. पहिल्या टप्प्यातील १५० गाडय़ांमध्ये १२ मीटर लांबीच्या १२५ आणि नऊ मीटर लांबीच्या २५ गाडय़ांचा समावेश आहे. त्यातील नऊ मीटर लांबीच्या २५ गाडय़ा भाडे तत्त्वावर घेण्यात आल्या आहेत.

या गाडय़ांची शहरातील काही मार्गावर चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर गाडय़ा ताफ्यात आल्या. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून या गाडय़ांची सेवा सुरू करण्यात येणार होती. मात्र कागदपत्रांची पूर्तता आणि मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नसल्यामुळे उद्घाटन लांबणीवर पडले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी या गाडय़ांचे लोकार्पण होणार आहे. सारसबागेजवळील सणस मैदानामध्ये दुपारी तीन वाजता हा कार्यक्रम होईल.

गाडय़ांचे प्रस्तावित मार्ग

* भेकराईनगर – पिंपळे-गुरव

* न. ता. वाडड – भेकराईनगर

* हडपसर – हिंजवडी

* डांगे चौक – हिंजवडी

* मनपा भवन – आकुर्डी

* भोसरी – निगडी

दोन ठिकाणी चार्जिगची सुविधा

पुण्यातील चार आणि पिंपरी-चिंचवड शहरातील तीन मार्ग ई-बससाठी निश्चित करण्यात आले आहेत. या २५ गाडय़ांपैकी १५ गाडय़ा पुण्यात आणि १० गाडय़ा पिंपरी-चिंचवड शहरात धावणार आहेत. दोन्ही शहरात चार्जिग स्टेशन उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पुण्यासाठी भेकराईनगर आगार येथे, तर पिंपरी-चिंचवडसाठी निगडी आगारात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

धाव २२५ किलोमीटर

तीन ते चार तास चार्जिग केल्यानंतर किमान २२५ किलोमीटर अंतरापर्यंत एक गाडी धावू शकते. या गाडीतून ३१ प्रवासी प्रवास करू शकतात. चार्जिगसाठी प्रती युनिट आठ रुपये खर्च येतो. या गाडय़ा वातानुकूलित आहेत.

ई-बसची वैशिष्टय़े

* अत्याधुनिक आयटीएमएस यंत्रणा

* सुरक्षिततेसाठी पॅनिक बटण

* मोबाइल चार्जिग सुविधा

* वातानुकूलन व्यवस्था

*  इंधन खर्चात मोठी बचत

पुण्यासाठी सर्वाधिक गाडय़ा

राज्यात सर्वाधिक ई-बस  पुण्यासाठी मंजूर झाल्या आहेत. देशातील अहमदाबाद, बेंगळुरु, कुलू या शहरानंतर राज्यात प्रथमच या गाडय़ा पुण्यात धावणार आहेत. १२ मीटर लांबीच्या १२५ गाडय़ा जुलैपर्यंत पीएमपीच्या ताफ्यात दाखल होण्याची शक्यता आहे. या गाडय़ा दाखल झाल्यानंतर शहराच्या मध्यवर्ती भागातूनही त्यांचे संचालन करण्याचे नियोजन आहे. सध्या दाखल होणाऱ्या २५ गाडय़ा बहुतांश उपनगरातून धावणार आहेत. डिझेलचा वाढता खर्च कमी करण्यासाठीही या गाडय़ा उपयुक्त ठरणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button