breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहरातील सर्वच रुग्णालयांचे फायर सेफ्टी ऑडिट तातडीने करा

– ज्येष्ठ नगरसेविका सिमा सावळे यांची मागणी

पिंपरी | प्रतिनिधी

भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील विशेष नवजात शिशु देखभाल विभागात (एसएनसीयू) आग लागून दहा अर्भकाचा अक्षरशः होरपळून मृत्यू झाला. मनाला चटका लावणाऱ्या या अत्यंत दुर्दैवी घटनेबद्दल देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अशा अपघातांची पुनरावर्ती टाळण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील सर्व रुग्णालयात असलेल्या एसएनसीयू विभागाचे तातडीने फायर सेफ्टी ऑडिट करावे, अशी मागणी ज्येष्ठ नगरसेविका सिमा सावळे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्याकडे केली आहे. दरम्यान, कोरोनाच्या काळात असंख्य अनधिकृत इमारतींमधून लहान-मोठी खासगी रुग्णालये सुरू झाली असून त्यांचेही फायर सेफ्टी ऑडिट नितांत गरजेचे आहे, अशीही सुचना सिमा सावळे यांनी महापालिका प्रशासनाला निवेदनाद्वारे केली.

निवेदनात नमूद केले आहे की, मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नवजात अतिदक्षता केअर युनिटमध्ये (एसएनसीयू) लागलेल्या आगीत १० नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. एसएनसीयूमध्ये एकूण १७ नवजात बालके होती. त्यापैकी ७ बालकांचा मृत्यू गुदमरून झाला तर, ३ बालके होरपळून मरण पावली. अन्य ७ बालकांना वाचवण्यात यश आले. ही घटना अत्यंत दुःखद, मनाला प्रचंड वेदना देणारी आहे. या बालकांच्या पालकांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत, असे सिमा सावळे यांनी नमूद केले. भंडारा जिल्हा रुग्णालयातील दुर्घटना पुन्हा कुठेही होऊ नयेत, यासाठी प्रशासनाने खबरदारी घेण्याची गरज आहे. फक्त आगीच्या दुर्घटना घडल्यावरच प्रशासन खडबडून जागे होत असते, हे बरोबर नाही. पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरातील सर्वच रुग्णालयांचे फायर सेफ्टी ऑडिट केले पाहिजे.  अनेक रुग्णालयांची फायर सिस्टम नाममात्र आहे किंवा नादुरुस्त आहे. महापालिकेच्याच नाही तर अनेक खासगी रुग्णालयांतील फायर सिस्टिम नियमित तपासणी करणे गरजेचे आहे. अग्निशमन विभागाकडून किमान दर सहा महिन्यांतून एकदा फायर सेफ्टी ऑडिट करावे, अशी मागणी सिमा सावळे यांनी त्यांच्या निवेदनात केली आहे.

कोरोनाच्या काळात पिंपरी चिंचवड शहरात अनेक अनाधिकृत इमारतींमध्ये खाजगी रुग्णालय सुरु झाली आहेत. अशा ठिकाणी फायर सेफ्टी बाबत कोणतीही खबरदारी अथवा उपाययोजना घेतली जात नाही. अशाप्रकारच्या दुर्घटना आपल्या शहरात होऊ नयेत यासाठी शासकीय रुग्णालयांसहीत शहरातील सर्व खाजगी रुग्णालयांचेही फायर सेफ्टी ऑडिट तातडीने करण्याचे मागणी सावळे यांनी मनपा आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्याकडे केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button