breaking-newsमुंबई

शरद पवार राज्यपालांच्या भेटीला; तर्कवितर्कांना उधाण

मुंबई: कोरोना परिस्थिती हाताळण्याच्या मुद्द्यावरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये संघर्ष सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार सोमवारी सकाळी अचानकपणे राजभवनात दाखल झाले. सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीच शरद पवार यांना भेटीचे निमंत्रण दिले होते. या विनंतीला मान देऊन पवार राजभवनावर दाखल झाले आहेत. त्यामुळे आता या भेटीत नक्की काय चर्चा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

गेल्या काही दिवसांपासून राज्यात भाजप आणि सत्ताधाऱ्यांमध्ये सातत्याने संघर्ष सुरु आहे. भाजपकडून नुकतेच ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलनही करण्यात आले होते. तसेच कालपासून श्रमिक ट्रेनच्या मुद्द्यावरुन रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकारमध्ये चांगलीच जुंपली आहे. राज्य सरकारच्या नियोजनाअभावी गेल्यावेळी रेल्वेला ६५ ट्रेन रद्द कराव्या लागल्या होत्या, असा आरोप रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केला होता. मात्र, राज्य सरकारने आपण रेल्वेला सर्व मजुरांची यादी आणि तपशील दिल्याचा दावा केला आहे. मात्र, पियुष गोयल यांनी हा दावा फेटाळून लावला होता.

यावरुन आता महाविकासआघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. याशिवाय, इतर अनेक मुद्द्यांवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सातत्याने संघर्ष झडताना दिसत आहे. सध्याच्या संकटकाळात ही गोष्ट राज्याला परवडण्यासारखी नाही. त्यामुळे आता राज्यपाल पुढाकार घेऊन महाविकासआघाडीचे मार्गदर्शक असलेल्या शरद पवार यांच्यापुढे काही प्रस्ताव ठेवतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शरद पवार यांनी यापूर्वी अनेक मुद्द्यांवरुन पत्र पाठवून केंद्राला सूचना केल्या होत्या. त्यामुळे आता राज्यपालांसोबतच्या भेटीनंतर ते महाविकासआघाडीच्या नेत्यांना सबुरीने वागण्याचा सल्ला देणार का,  हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button