breaking-newsमहाराष्ट्र

वृध्दांसाठीच्या प्रतिबंधक लसीचा वाढतोय “ट्रेंड’

  • प्रतिकार शक्ती कमी होत चालल्याने विविध आजारांच्या प्रमाणात वाढ 
    – लहान मुलांप्रमाणेच वृध्दांनाही प्रतिबंधक लसीची गरज

पुणे– ज्याप्रमाणे लहान मुलांना रोगांची लागण होऊ नये यासाठी पाच वर्षांपर्यंत अनेक प्रतिबंधक लस दिल्या जातात. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठीही प्रतिबंधक लसी देण्याचे प्रमाण वाढत आहे. जसजशी रुग्णांमध्ये याची जागृती होत आहे त्यानुसार याचा ट्रेंड वाढताना दिसतो आहे. ज्येष्ठांना प्रतिबंधक लस ही येत्या काळाची गरज असल्याचे डॉक्‍टरांचेही मत आहे.

 

लहान मुलांना गोवर, पोलिओ, ताप, धनुर्वात अशा विविध लस दिल्या जातात. लहान मुलं ही आजुबाजूच्या वातावरणाचा प्रतिकार करण्यासाठी तेवढी परिपक्‍व नसतात. त्यामुळेच त्यांना अशा रोगांची लागण होऊ नये यासाठीच्या प्रतिबंधक लस दिल्या जातात. हल्ली ज्येष्ठ नागरिकांमध्ये आजारांचे प्रमाण वाढले आहे. त्यांचीही प्रतिकार शक्ती दिवसेंदिवस कमी होत असल्याने त्यांनाही प्रतिबंधक लस देण्यात येतात. परदेशात याबाबत जनजागृती झाली असून तेथे असे लसीकरण करून घेण्यासाठी ज्येष्ठ मंडळी रांगा लावून उभे असतात. भारतात हा प्रकार काही आरोग्य विषयक जागरुक नागरिकांमध्ये दिसून येतो आहे. मात्र अद्यापही सर्वत्र याचे प्रमाण पहायला मिळत नाही.
याविषयी भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेच्या लसीकरण समितीचे अध्यक्ष डॉ. प्रमोद जोग म्हणाले, साधारण 65 वर्षांपुढील व्यक्‍तींनी प्रतिबंधक लसीकरण करून घेणे कधीही चांगले आहे. त्याबाबतची जनजागृती वाढली आहे. या लसीकरणात ज्येष्ठांना तीन प्रकारच्या लसी दिल्या जातात. एक म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या तपासणीसाठीची प्रतिबंधक लस, दुसरी फुफ्फुसांचा दाह (निमोनिया) आणि तिसरी नागीन (हार्पिस झोस्टर) या आजारांना प्रतिबंध यांचा समावेश असतो. नागिनसाठी लस अद्याप भारतात उपलब्ध नाही. मधुमेहींना आणि फुफ्फुस, किडनी, हृदयरोग असणाऱ्या व्यक्‍तींनी या प्रतिबंधक लस घेणे गरजेचे आहे. या व्यतिरिक्‍त अडल्ट व्हॅक्‍सिनेशनमध्ये 9 ते 14 वयोगटातील मुलींना दिली जाणारी लस आता 45 वयापर्यंतच्या महिला घेतात. गर्भाशयाच्या तोंडाचा कॅन्सर होऊ नये यासाठीचीही लस असते.

प्रौढांसाठी प्रतिबंधक लसीचे (अडल्ट व्हॅक्‍सिनेशन) प्रमाण भारतात सध्या जास्त नसले तरीही त्याबाबत हळूहळू जनजागृती वाढते आहे. प्रौढांमधील प्रतिकार शक्ती कमी होत असल्याने त्यांना अशा प्रतिबंधक लसी देणे गरज आहे. मुलांनी आपल्या आई-वडिलांना 65 वयानंतर अशा प्रकारची भेट द्यावी जेणेकरून त्यांना आरोग्य चांगले ठेवण्यास मदत होईल.
– डॉ.प्रमोद जोग, अध्यक्ष, भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेची लसीकरण समिती

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button