breaking-newsमहाराष्ट्र

विरार-डहाणू रेल्वे चौपदरीकरण संथगतीने

  • मुदतीत काम पूर्ण करण्याच्या ‘एमआरव्हीसी’च्या दाव्यावर प्रश्नचिन्ह

पालघर – पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांचा प्रवास सुलभ व्हावा यासाठी विरार-डहाणू रेल्वे चौपदरीकरणाचा निर्णय घेतला असला तरी हे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. अद्याप भूसंपादनाचेही काम पूर्ण झाले नसल्याने २०२३पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याच्या महाराष्ट्र रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या (एमआरव्हीसी) दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

डहाणू रोड ते विरार या पश्चिम रेल्वेच्या मार्गावर दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. त्यांचा प्रवास सुलभ व्हावा आणि वाढत्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता यासाठी गाडय़ांची आणि फेऱ्यांची संख्या वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र गाडय़ांची संख्या वाढवण्यासाठी चौपदारीकरणाची गरज होती. त्या अनुषंगाने उपनगरीय रेल्वे मार्गाचे डहाणू रोड ते विरारदरम्यान चौपदरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पासाठी भूसंपादनाचे प्रस्ताव पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात ऑगस्ट २०१७मध्ये तयार करण्यात आले होते. डिसेंबर २०१८पर्यंत भूसंपादनाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र हे काम रखडले असल्याची माहिती पुढे आली आहे.

सध्याचे चित्र पाहता भूसंपादनाचे काम पूर्ण होण्यास किमान सहा महिन्यांचा अवधी लागण्याची चिन्हे आहेत. भूसंपादनाचे काम पूर्ण झाल्यास जमिनीचा भराव आणि पुलाच्या कामांसाठी निविदा काढण्याचे आणि त्यानंतर रूळ टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. मात्र भूसंपादनालाच विलंब झाला असल्याचे मान्य करतानाच, जिल्हा प्रशासनाच्या मदतीने जमिनीची मोजणी सुरू असल्याचे आणि या विलंबाचा परिणाम अन्य कामांवर होणार नसल्याचे एमआरव्हीसीने सांगितले. भूसंपादनाचे काम लांबले असले तरी प्रकल्प वेळेतच पूर्ण होईल, असे एमआरव्हीसीने माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले.

भूसंपादनाचे केवळ थोडेच काम राहिले आहे. ते लवकरच पूर्ण होईल. प्रकल्पासाठी निधीची कमतरता असून ती पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. दिलेल्या वेळेत हा प्रकल्प पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.

– अनिल पटके, मुख्य प्रबंधक, एमआरव्हीसी

डहाणू-विरार रेल्वेचे चौपदरीकरण वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. या प्रकल्पाची प्रगती पाहत तो २०२३पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता धुसर आहे. सामान्य प्रवाशांसाठी महत्त्वाचा नसलेला बुलेट ट्रेनचा प्रकल्प वेगाने पुढे सरकत आहे, मात्र प्रवाशांसाठी महत्त्वाचा असलेला चौपदरीकरणाचा प्रकल्प संथगतीने सुरू आहे.

– हितेश सावे, खजिनदार, डहाणू-वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button