breaking-newsक्रिडा

विम्बल्डन टेनिस स्पर्धा: किकी बर्टन्सचा प्लिस्कोव्हाला धक्‍का

  • प्लिस्कोव्हाच्या पराभवाने अखेरची टॉप-10 महिला बाहेर

लंडन – हॉलंडच्या विसाव्या मानांकित किकी बर्टन्सने झेक प्रजासत्ताकाच्या सातव्या मानांकित कॅरोलिना प्लिस्कोव्हावर 6-3, 7-6 सनसनाटी मात करताना विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत धडक मारली. सातव्या मानांकित प्लिस्कोव्हाच्या पराभवामुळे महिला एकेरीतील टॉप-10 मानांकितांमधील अखेरची खेळाडू स्पर्धेबाहेर गेली आहे. मात्र 11व्या मानांकित अँजेलिक कर्बरने बेलिंडा बेन्किकचा 6-3, 7-6 असा पराभ” करताना उपान्त्यपूर्व फेरीत आपले आव्हान काम राखले.

किकी बर्टन्सने प्लिस्कोव्हाचे आव्हान एक तास 38 मिनिटांत मोडून काढताना अखेरच्या आठ खेळाडूंमध्ये स्थान मिळविले. याचाच अर्थ असा की महिला एकेरीतील उपान्त्यपूर्व फेरीत पोहोचणाऱ्या आठ खेळाडूंमध्ये अव्वल 10 मानांकितांपैकी एकही खेळाडू असणार नाही. किकी बर्टन्सने तब्बल सव्वादोन वर्षांनंतर पहिल्यांदाच ग्रॅंड स्लॅम स्पर्धेची उपान्त्यपूर्व फेरी गाठली आहे. तिने याआधी 2016 फ्रेंच ओपन स्पर्धेत ही कामगिरी केली होती.

किकी बर्टन्ससमोर उपान्त्यपूर्व फेरीत 13वी मानांकित ज्युलिया जॉर्जेसचे आव्हान आहे. ज्युलियाने क्रोएशियाच्या बिगरमानांकित डोना वेकिकचा प्रतिकार 6-3, 6-2 असा मोडून काढत उपान्त्यपूर्व फेरी गाठली.
याशिवाय लात्वियाच्या 12व्या मानांकित येलेना ऑस्टापेन्कोसह इटलीची कॅमिला गिओर्गी आणि स्लोव्हाकियाची डॉमिनिका चिबुल्कोव्हा या बिगरमानांकितांनीही वेगवेगळ्या शैलीत विजयाची नोंद करताना महिला एकेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत धडक मारली.

ऑस्टापेन्कोने बेल्जियमच्या बिगरमानांकित अलक्‍झांड्रा सॅस्नोविचचा पहिल्या सेटमधील प्रतिकार मोडून काढताना 7-6, 6-0 अशा विजयासह आगेकूच केली. ऑस्टापेन्कोसमोर आता स्लोव्हाकियाच्या बिगरमानांकित डॉमिनिका चिबुल्कोव्हाचे आव्हान आहे.

चिबुल्कोव्हाने सिमोना हालेपवर खळबळजनक विजय मिळविणाऱ्या तैपेईच्या सु वेई हसिहची झुंज 6-4, 6-1 अशी मोडून काढताना उपान्त्यपूर्व फेरी गाठली. महिला एकेरीतील बिगरमानांकित खेळाडूंमधील लढतीत इटलीच्या कॅमिला गिओर्गीने रशियाच्या एकेटेरिना माकारोव्हाचे आव्हान 6-3, 6-4 असे संपुष्टात आणले. गिओर्गीसमोर आता 25वी मानांकित सेरेना विल्यम्स आणि रशियाची एव्हजेनिया रॉडिना यांच्यातील विजयी खेळाडूचे आव्हान आहे.

रॉजर फेडरर उपान्त्यपूर्व फेरीत अग्रमानांकित रॉजर फेडररने फ्रान्सच्या ऍड्रियन मॅनारिनोची कडवी झुंज मोडून काढताना पुरुष एकेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत धडक मारणारा पहिला खेळाडू बनण्याचा मान मिळविला. फेडररने मॅनारिनोचा 6-0, 7-5, 6-4 असा सुमारे अडीच तासांच्या लढतीनंतर पराभव केला. फेडररसमोर उपान्त्यपूर्व फेरीत दक्षिण आफ्रिकेचा आठवा मानांकित केविन अँडरसन आणि फ्रान्सचा बिगरमानांकित गेल मॉन्फिल्स यांच्यातील विजयी खेळाडूचे आव्हान आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button