breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

विद्यार्थ्यांनो…राजकारणाच्या भानगडीत पडू नका – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे |महाईन्यूज|

‘आम्ही कधीपर्यंत खूर्चीवर, जनता सांगेल तोपर्यंत. जनता म्हणाली घरी बसा की आम्ही चाललो. पण सीईओ जोपर्यंत रिटायर होत नाही, तोपर्यंत खूर्चीवर, शिवाय प्रमोशन होत जातं. राजकारणाच्या भानगडीत पडू नका, मी राजकारणात आलोय, अडकलोय. कुठे जाता येईना आणि बाहेरही पडता येईना,’ असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

पुणे जिल्हा परिषदेत राज्य गुणवत्ता यादीत आलेल्या शालेय विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आलं. यावेळी बोलताना अजित पवारांनी जोरदार टोलेबाजी करत विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद साधला.

कोरोनामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आहे, त्यामुळे नवीन माध्यम स्वीकारलं पाहिजे. ऑनलाईन शिक्षण सुरू आहे, पण कोरोना अजून गेलेला नाही, त्यामुळे काळजी घेतली पाहिजे. माझा उच्चार व्यवस्थित व्हावा, यासाठी मी मास्क काढला. नाहीतर तुम्हीच म्हणाल, या बाबानेच मास्क घातला नाही आणि आम्हाला सांगतोय, अशा शब्दांमध्ये अजित पवारांनी शाब्दिक फटकेबाजी केली.

‘अनेकजण कोरोनामुळे नोकरी गेल्याचं मला सांगतात. पण करियर निवडताना विचार करा, आपल्या वडिलांना विचारा. व्यवसाय करता येईल का? प्रशासकीय सेवेत येता येईल का ? याचा विचार करा. अभिनेता, कला संगीत, पत्रकार असं वेगवेगळं क्षेत्र निवडू शकता. आनंद आणि पैसे मिळतील, असं क्षेत्र निवडा,’ असा सल्ला अजितदादांनी मुलांना दिला.

‘कोणत्याही क्षेत्रात जा, पण आई-वडिलांचे नाव रोशन करा. चारित्र्याला डाग लागणार नाही, याचा विचार करा. विश्वासार्हता संपली की माणूस संपतो. मित्र निवडताना चांगले मित्र निवडा. मित्रच बरबाद करायला असतात,’ असं वक्तव्य अजित पवारांनी केलं.

विद्यार्थ्यांचे टोचले कान

‘मी पाच वाजता उठलो आणि तासभर व्यायाम केला. सात वाजता एक उद्घाटन केलं. लोक विचारतात झोपला होता का? काही पुढाऱ्यांचं पोट पुढे आलंय. स्टेजवरची लोकंही सुटायला लागलेत. पण तुम्ही व्यायाम करा,’ असं मुलांना सांगतानाच अजित पवारांनी त्यांच्याच पदाधिकाऱ्यांचेही कान टोचले. बायको आल्यावर आई-वडिलांना विसरून जाऊ नका, असं भावनिक आवाहनही अजितदादांनी मुलांना केलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button