breaking-newsTOP Newsपिंपरी / चिंचवड

‘वायसीएम’वर सत्ता गाजवण्याचा नगरसेवकांना हव्यास, डॉक्टरांनी काळ्या फिती लावून केला निषेध

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश वाबळे यांच्याबाबत सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी अपशब्द वापरल्याबद्दल वायसीएमच्या सर्व डॉक्टरांनी आज सकाळपासून काळ्या फिती लावून याचा निषेध केला आहे. लोकप्रतिनिधींच्या अशा भूमिकेमुळे डॉक्टरांचे लक्ष विचलीत होऊन कोरोनाबाधीत रुग्णांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम पडल्यास याला कोण जबाबदार, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अधिष्ठाता डॉ. राजेश वाबळे प्रामाणिकपणे रुग्णसेवेचे कार्य करत आहेत. त्यांचा स्टाफ इमानेइतबारे कोरोनाकाळात कार्यरत आहे. नागरिकांच्या गळ्याभोवती कोविड 19 चा फास आवळत जात असतानाच यातून मार्ग काढण्याचे सोडून लोकप्रतिनिधी डॉक्टरांच्या मुद्याचे भांडवल करत आहेत. परवाच्या महासभेत नगरसेवकांनी डॉ. वाबळे यांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. मात्र, सध्या वाद करण्याची परिस्थिती नसून कोरोनाच्या विळख्यातून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. लोकप्रतिनिधींच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे डॉक्टरांची मने दुखावली आहेत.

नगरसेवकांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा वायसीएममधील सर्व डॉक्टरांनी जाहीर निषेध केला आहे. आज सकाळपासून सर्व डॉक्टर काळ्या फिती लावून रुग्णसेवेसाठी कार्यरत आहेत. आज महापौर उषा उर्फ माई ढोरे यांची भेट देऊन निवेदन दिले जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून डॉ. वाबळे यांना महासभेत बोलावून त्यांना अवमानकारक वागणूक दिली जात आहे. वायसीएमवर अधिकार गाजवण्याच्या हव्यासापोटी केंद्र शासनाने मंजूर केलेल्या वायसीएम वैद्यकीय शिक्षण संस्थेचा गळा आवळण्याचे षडयंत्र नगरसेवक आखत आहेत. लोकप्रतिनिधींच्या वागणुकीमुळे डॉक्टरांच्या स्वाभिमानावर घाला घातला जात आहे. अशी वागणूक देऊन डॉक्टरांचे मनोधैर्य खच्चीकरण केले जात आहे, असा आरोप डॉक्टरांनी केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button