breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘वाघिणीच्या पाठीराख्यांनी आमच्या शेतात काम करून दाखवावं

अवनी या वाघिणीला शिकाऱ्यांनी ठार केल्यानंतर यावरून सरकारवर टीका होताना दिसते आहे. मात्र पांढरकवडा भागातील ग्रामस्थांनी अवनीचे पाठीराखे आमच्या शेतात काम करु शकतील का? असा प्रश्न विचारला आहे. ज्या लोकांना अवनी वाघिणीच्या शिकारीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत त्यांनी आमच्या शेतात काम करू दाखवावं असं आव्हानच गावकऱ्यांन दिलं आहे. तुम्ही जेव्हा आमच्या शेतात काम कराल तेव्हा तुम्हाला आमच्या समस्या समजतील असंही गावकऱ्यांनी म्हटलं आहे.

यवतमाळच्या पांढरकवडा भागात असलेल्या अवनी या टी१ वाघिणीला शुक्रवारी रात्री ठार करण्यात आले. त्यानंतर सातत्याने सरकारवर टीका होताना दिसते आहे. एवढेच नाही तर केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनीही या संदर्भात चौकशी झाली पाहिजे. शिकार अत्यंत निर्घृणपणे करण्यात आली असे म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. तरीही याप्रकरणी गावकरी म्हणत आहेत की जे लोक वाघिणीची बाजू घेत आहेत ते आमच्या शेतात काम करुन दाखवा.

वन्यप्राणी महत्त्वाचे आहेत यात काहीही शंका नाही पण माणसं महत्त्वाची नाहीत का? असेही गावकऱ्यांनी विचारले आहे. वाघिणीने १३ जणांचा बळी घेतला ज्यामुळे अनेक संसार उघड्यावर आले. आमच्या गावांमधील ज्या भागांमध्ये वन्य प्राणी धुडगूस घालतात तिथे सौरकुंपण दिले तर हल्ले टळू शकतात असाही सल्ला गावकऱ्यांनी दिला. अवनी वाघिणीच्या हल्ल्यात यवतमाळचे गजानान पवार ठार झाले होते. त्यानंतर मुलाच्या मृत्यूच्या धक्क्याने गजानन यांच्या वडिलांचाही मृत्यू झाला. त्यामुळे गजानन पवार यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले असेही गावकऱ्यांनी म्हटले आहे.

दरम्यान वन्यप्रेमी ज्याप्रमाणे हळहळ करत आहेत त्यांनीही ज्या गावांमध्ये वाघिणीची दहशत होती त्या गावांमध्ये तीन दिवस कुटुंबासह राहू दाखवा असेही आवाहन वाघिणीची दहशत असलेल्या गावांमधून होते आहे. मुंबई-पुण्यात एसी हॉलमध्ये बसून अवनीची पाठराखण करणे सोपे आहे. जे वाघिणीची पाठराखण करत आहेत त्यांनी हिंमत असेल तर पांढरकवडा, राळेगाव, कळंब या तालुक्यातल्या कोणत्याही गावात दोन ते तीन दिवस मुक्काम करून दाखवावा म्हणजे दहशत काय असते ते त्यांना समजेल असाही पवित्रा त्या गावांमधील गावकऱ्यांनी घेतला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button