breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

लोकसभेत नुसतं प्रश्न मांडून काय उपयोग; खासदार बारणेंनी एक तरी प्रश्न सोडविला का? – शेकापचे जयंत पाटलांची टीका

  • शिवसेनेवर शेतकरी, कष्टकरी कामगार वर्ग नाराज
  • पाच वर्षे नुसती आश्वासन दिली, पण एकही प्रश्न सोडविला

पिंपरी ( महा ई न्यूज ) – मावळ लोकसभेचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत किती प्रश्न मांडले, यापेक्षा त्यांनी मांडलेल्या प्रश्नांवर सरकारने काय उत्तरे दिली, शेतकरी, कष्टकरी कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांना अनेक आश्वासने दिली, पण त्या आश्वासनांपैकी एकही प्रश्न सोडविला नाही. त्यामुळे लोकसभेत नुसंत प्रश्न मांडून चालत नाही, ते प्रश्न सोडविण्याची लोकप्रतिनिधींमध्ये धमक लागते, अशी टीका शेकापचे ज्येष्ठ नेते, आमदार जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.

वाकड येथे शेतकरी कामगार पक्षाच्या पिंपरी-चिंचवड पदाधिका-यांची बैठक पार पडली. यावेळी शहराध्यक्ष नितीन बनसोडे, नानासाहेब फुगे, राहूल पोकळे, छायाताई दिसले, हरेश मोरे आदी उपस्थित होते.

आमदार पाटील म्हणाले की, लोकसभेत शिवसेना खासदारांनी अनेक प्रश्न मांडले, ते प्रश्न मांडूनही त्यातील एकही प्रश्न आजतागायत सुटलेला नाही. नुसतं लोकसभेत प्रश्न मांडल्याने काहीच होत नाही. त्या प्रश्नांवर सरकारने काय उत्तरे दिली, ते प्रश्न सोडविण्यासाठी खासदारांनी किती प्रयत्न केला. पाठपुरावा करुनही प्रश्न सुटत नसेल तर खासदारांना प्रश्न सोडविता येत नाही, असे दिसून येते. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील रेडझोन, लष्करांच्या हद्दीतील रस्ते, रेल्वेचे विस्तारीकरण, मावळातील प्रकल्पग्रस्त शेतक-यांचा साडेबारा टक्के परतावा, यासह अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. मुळातच पिंपरी-चिंचवड शहर स्मार्ट सिटी असताना आता केंद्र सरकारने या स्मार्ट सिटीची दैयंनिय अवस्था करुन ठेवली आहे.

देशात प्रतिगामी शक्ती जोराने वाढत आहे.मोदी सरकारने डाॅ. बाबासाहेब आंबेडकराचे संविधान बदलण्याचे षडयंत्र रचले आहे. हे सरकार संविधान बदलण्याची भाषा करतेय, त्याचे अनुयायी संविधान जाळत आहेत. देशाचे सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायाधिश न्याय मागण्यासाठी रस्त्यावर येतात. त्यामुळे न्यायसंस्थाही अडचणीत आहे. आरबीआय गव्हर्नर चार वेळा बदलेले जातात. या सरकारच्या दबावापोटी अनेकांनी राजीनामे दिले. हे देशाचे दुर्भाग्य आहे.  आता तर मोदी विकासाचा अजेंठा बदलून केवळ राम मंदिर, कट्टर हिंदूत्व, धर्मंधता यावर बोलत आहेत. या जातीवादी सरकारला सत्तेतून दूर हटविण्यासाठी आम्ही महाआघाडीत सामील झाला आहोत.

पार्थ पवारांना आम्ही लोकसभेत पाठवू 

पनवेल, उरण आणि कर्जतमध्ये शेतकरी कामगार पक्षाला मानणारा शेतकरी, कामगार, शेतमजूर, कष्टकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. या तिन्ही मतदार संघात शेकापची पावणे पाच लाख मते आहेत. आमचा पक्ष कधीही तडजोड करीत नाही, इतर पक्षापेक्षा आम्ही पक्ष संघटन, बूथनिहाय बांधणी केल्याने पार्थ पवारांना मोठ्या मताधिक्याने  विजयी करणार आहोत. तसेच शरद पवार यांनी शेतक-यांना साडेबारा टक्के परतावा, शेतक-यांच्या जमिनी परत मिळवून देण्यास केलेली मदत, त्याचा प्रत्येक कार्यकर्त्यांशी असलेला संपर्कामुळे पार्थ पवारांच्या विजयात कुठलीही अडचण येणार नाही, असेही जयंत पाटील यांनी सांगितले. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button