राहुल गांधींबाबत मी जे बोललो त्यावर ठाम आहे : योगेश सोमण
नवी दिल्ली । महाईन्यूज । प्रतिनिधी
राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह टीका केल्याबाबत मुंबई विदयापीठाचे प्राध्यापक योगेश सोमण यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते.
मात्र, मला सक्तीच्या रजेवर पाठविल्याची माहिती प्रसारमाध्यमांकडून मिळाली आहे. त्याबाबत अधिकृत माहिती हाती आल्यानंतर माझी भूमिका स्पष्ट करीन. तरीही मी माझ्या वक्तव्याबाबत ठाम आहे, अशी प्रतिक्रीया सोमण यांनी दिली आहे.
योगेश सोमण यांनी राहुल गांधी यांच्याबाबत समाज माध्यमांवर आक्षेपार्ह मत नोंदवले होते. त्यानंतर एनएसयूआय या संघटनेने सोमण यांना हटवण्याची मागणी सुरू केली. नाटय़शास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनीही विभागात पुरेशा सुविधा नसल्याचा आक्षेप घेत आंदोलन सुरू केले. छात्रभारती या संघटनेनेही आंदोलनात उडी घेतली. अखेर विद्यापीठाने १३ जानेवारी रोजी सोमण यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची कारवाई केली. त्यानंतर सोमण यांना भाजपच्या नेत्यांनी पाठिंबा दिला.