breaking-newsपुणेमहाराष्ट्र

राष्ट्रीय लष्करी वस्तुसंग्रहालय पाहायलाच हवे

भारतीय लष्करामध्ये पराक्रमाची गाथा लिहिणाऱ्या महार रेजिमेंटमधील वीर जवानांची पदके, लष्करी पोषाख, आणि दुर्मीळ छायाचित्रे यांचा समावेश असलेले राष्ट्रीय लष्करी वस्तुसंग्रहालय प्रत्येकाने पाहायलाच हवे असे आहे. सुभेदार धर्माजी खांबे यांच्या स्मरणार्थ साकारलेल्या या राष्ट्रीय लष्करी वस्तुसंग्रहालयाची ‘इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस’ आणि लंडन येथील ‘आर्मरर’ या नियतकालिकानेही दखल घेतली असून नागरी व्यक्तीने साकारलेले महार रेजिमेंटचे स्मारक असे या संग्रहालयाचे स्वरूप आहे.

भारतीय लष्करामध्ये अतुलनीय पराक्रम करणाऱ्या महार रेजिमेंटशी संबंधित दुर्मीळ वस्तू या संग्रहालयात पहायला मिळतात. सुभेदार धर्माजी खांबे यांनी महार रेजिमेंटमधून लढताना शौर्य गाजविले होते. त्यांचे पुत्र सुधाकर धर्माजी खांबे यांनी या राष्ट्रीय लष्करी वस्तुसंग्रहालयाची स्थापना केली. राज्य शासनाच्या रोजगार आणि स्वयंरोजगार विनियोग कार्यालयातून रोजगार अधिकारी म्हणून २०१० मध्ये सुधाकर खांबे निवृत्त झाले.

महार रेजिमेंटच्या अमृतमहोत्सवानिमित्त  डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेतर्फे (बार्टी) मुंबई येथील गेट वे ऑफ इंडिया येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रीय लष्करी वस्तुसंग्रहालयाच्या स्थापनेबद्दल खांबे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते. संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आणि महार रेजिमेंटचे कमांडंड ब्रिगेडियर असित वाजपेयी या वेळी उपस्थित होते.

या संग्रहालयाबद्दल माहिती देताना खांबे म्हणाले, माझे आजोबा (आईचे वडील) नाईक संभू शिवराम म्हाळुंगकर यांनी शंभर वर्षांपूर्वी झालेल्या पहिल्या महायुद्धात सहभाग घेतला होता. एडन येथे ते लढण्यासाठी गेले होते. त्यांची दोन पदके आणि सेवानिवृत्ती पुस्तक (डिस्चार्ज बुक) माझ्या संग्रही आहे. माझे वडील सुभेदार धर्माजी खांबे हे लष्करामध्ये १९२६ ते १९३६ या कालावधीत जाट रेजिमेंटमध्ये होते. त्यांनी दुसऱ्या महायुद्धात सहभाग घेतला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महार रेजिमेंटची स्थापना केल्यावर सुभेदार खांबे या रेजिमेंटमध्ये दाखल झाले. त्यांची पदके, लष्करी पोषाख, बेल्ट, टोप्या, दुर्मीळ छायाचित्रे आणि महार रेजिमेंटसंबंधीच्या बातम्यांची कात्रणे या साऱ्यांचा संग्रह मी केला आहे. त्यामध्ये पं. जवाहरलाल नेहरू यांनी महार रेजिमेंटच्या कार्याचा गौरव करणाऱ्या पत्राचा समावेश आहे. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना हा संग्रह दाखविला होता. माझ्या संग्रहाचे कौतुक करून त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे संग्रहालयासाठी स्वतंत्र दालन देण्याची सूचना महापालिकेला केली. त्यानुसार साकारण्यात आलेल्या या संग्रहालयाचे ९ एप्रिल २००० रोजी विलासराव देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन झाले. राष्ट्रपती असताना प्रतिभा पाटील यांनी संग्रहालयाला भेट दिली होती.

संग्रहालय विशेष

* नाईक संभू शिवराम म्हाळुंगकर यांची शंभर वर्षांपूर्वीची दोन पदके

* सुभेदार धर्माजी खांबे यांची लष्करी पदके

* लष्करी पोषाख, बेल्ट, टोप्या, दुर्मीळ छायाचित्रे

* महार रेजिमेंटसंबंधीच्या बातम्यांची कात्रणे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button