breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

‘राष्ट्रपती’पदक द्यायला सन्मानयीय राष्ट्रपतींना ३ तास काढता येत नाही का?- ‘धुरळा’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाची खदखद

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण यंदाही राष्ट्रपतींच्या हस्ते न झाल्याने ‘धुरळा’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी संताप व्यक्त केला आहे. या मानाच्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी राष्ट्रपतींना तीन तासांसाठी वेळ काढता येत नाही का? असा सवालही त्यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून केला आहे. यंदा या पुरस्कारांचे वितरण उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते करण्यात आले.

विद्वांस म्हणतात, “मागच्या वर्षीपासून हे काय नवीन सुरू झालंय? ‘राष्ट्रपती’पदक द्यायला सन्मानयीय राष्ट्रपतींना ३ तास काढता येत नाहीत? मान्य आहे की, आपल्या देशात राष्ट्रपती खूऽऽऽप व्यस्त असतात पण हे ‘राष्ट्रीय’ पुरस्कार आहेत, याआधीचे सर्व काढतच होते की वेळ. त्यांच्या वेळेनुसारच सगळं आयोजित होतं ना!” अशा शब्दांत त्यांनी आपल्या मनातली खदखद व्यक्त केली आहे.

गेल्या वर्षापासून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण हे वेळ मारुन नेल्याप्रमाणे राष्ट्रपतींऐवजी इतरांच्या हस्ते देण्यात येत आहेत. मागचा ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण तत्कालीन माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. मात्र, पुरस्कार वितरणाआधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार मिळणार नसल्याचं कळताच काही कलाकारांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे अनेक कलाकारांनी नाराजी व्यक्त केली होती.

यंदाचा ६६वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०१९ सोहळा राजधानी दिल्लीतील विज्ञान भवनात सोमवारी जल्लोषात पार पडला. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते वर्षभरात अभिनयाचा ठसा उमटविणाऱ्या कलाकरांचा गौरव करण्यात आला. आयुषमान खुरानाला ‘अंधाधून’, तर विक्की कौशलला ‘उरीः द सर्जिकल स्ट्राइक’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्याचबरोबर दाक्षिणात्य अभिनेत्री कीर्ति सुरेशला ‘महानती’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. सुरेखा सीकरी यांना ‘बधाई हो’ या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्कार गौरवण्यात आलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button