breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

रावेत बंधा-याची उंची वाढविण्यासाठी सर्वेक्षण पुर्ण

पिंपरी –  पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिका पवना नदीच्या रावेत बंधा-यातून पाणी उपसा करते. या बंधार्‍यात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. तसेच,पाणीसाठा अधिक व्हावा म्हणून बंधार्‍याची उंची वाढविण्याचे पालिकेचे नियोजन आहे. त्यादृष्टीने महापालिकेने बंधार्‍याचे सर्वेक्षण पुर्ण केले आहे. 

पवना नदीतून पालिका दररोज 470 ते 500 एमएलडी पाणी उपसा करते. पवना धरणातून पाणी कमी प्रमाणात सोडल्यामुळे रावेत बंधारा येथील पाणी पातळी कमी होऊन  येथील पालिकेचे विद्युत पंप बंद पडतात. त्यामुळे शहरातील काही भागात पाणीपुरवठा विस्कळीत होऊन पाणीटंचाई निर्माण होते. त्या संदर्भात नागरिकांसह नगरसेवकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. ही परिस्थिती वारंवार निर्माण होत आहे.  त्यातच रावेत बंधार्‍यात मोठ्या प्रमाणात गाळ जमा झाला आहे. त्यामुळे बंधार्‍यात पूर्ण क्षमतेने पुरेसा प्रमाणात पाणीसाठा होत नाही. परिणामी, पालिकेचे विद्युत पंप बंद पडत आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी पालिकेकडून नुकतेच रावेत बंधार्‍याचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. हे काम खासगी संस्थेमार्फत करण्यात आले आहे. त्यासंदर्भात जलसंपदा विभागास पालिकेने पत्र पाठविले आहे.

बंधार्‍यात अनेक वर्षांपासून साचलेला गाळ काढणे. बंधार्‍याची उंची वाढविणे आदी कामे जलसंपदा विभागामार्फत केली जाणार आहेत. काम कसे आणि केव्हा करायचे, यासंदर्भात जलसंपदा विभागाकडून प्रतिसाद मिळताच प्रत्यक्ष कामास सुरुवात केली जाणार आहे. त्यासाठी लागणारा सर्व खर्च पालिका करणार आहे. त्यामुळे बंधार्‍यात पुरेसा पाणीसाठा होऊन विद्युत पंप बंद पडण्याचा प्रश्‍न काही प्रमाणात सुटणार आहे, असा दावा पाणीपुरवठा विभागाने केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button