breaking-newsTOP NewsUncategorizedगणेशोत्सव-२०२३ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमराठवाडालेख

गणेशोत्सव 2022 ः गणपती गौरी अन, खान्देशातील भालदेव

पिंपरी-चिंचवड । महान्यूज । विशेष प्रतिनिधी।

गौरी

गणपतीबरोबर येणारा गौरी सणदेखील अनेक घरात साजरा केला जातो. म्हणूनच गणपती प्रतिष्ठापणेनंतर तिसर्‍या दिवशी येणार्‍या गौरींना गौरी-गणपती असेदेखील म्हटले जाते. यामध्ये गौरींची स्थापना करुन त्यांचे मनोभावे पूजन करण्यात येते. महाराष्ट्रात या सणाला महालक्ष्मीपूजन असेही म्हणतात. प्रत्येक कुटुंबात आपल्या कुलाचाराप्रमाणे गौरी बसविल्या जातात. पहिल्या दिवशी घरातील तुळशीपासून पावला-पावलांनी डोक्यावरुन या गौरींना घरात आणले जाते. यावेळी गणपतीच्या आईचे म्हणजेच गौरींचे माहेरवाशीणीसारखे स्वागत केले जाते. त्यांना नवीन वस्त्र, दागदागिने घालून सजविण्यात येते.

ज्येष्ठगौरी अनुराधा नक्षत्रात येतात. ज्येष्ठा नक्षत्रात त्यांचे पूजन केले जाते. मूळ नक्षत्रात त्यांचे विसर्जन केले जाते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने कुटुंबातील सगळे जण एकत्र येतात. त्यावेळी आपल्या घरी माहेरवाशीण म्हणून तीन दिवस राहणार्‍या या गौरींसाठी छानशी सजावटही केली जाते. यामध्ये फुलांनी, घरातील स्त्रियांनी केलेल्या कलाकुसरीच्या वस्तूंनी किंवा बाजारात तयार मिळणारे सजावटीचे सामान वापरुन सजावट केली जाते. काही घरात फक्त मुखवट्यांची पूजा होते तर काहींकडे पूर्ण उभ्या गौरी असतात. अनेक ठिकाणी आता लाकडी गौरीदेखील बसवल्या जातात.

कोकणात काही ठिकाणी खुर्चीवर बसलेली गौरी असते. तर समुद्रातील किंवा नदीतील खडा आणून त्या पूजण्याचीही रित असते. तर काहीजणांकडे तांब्यावर चेहरा रेखाटून गौरींचे पूजन केले जाते. पहिल्या दिवशी गौरीला भाजी आणि भाकरीचा नैवेद्य दाखविला जातो. गौरी आपल्याकडे माहेरवाशीण म्हणून आल्याने त्यांना खाण्यासाठी लाडू, चिवडा, करंज्या असे फराळाचे पदार्थ, मिठाई, फळे यांचा नैवेद्य दाखविण्यात येतो. तसेच गौरीला विविध प्रकारची फुले आणि पत्री वाहण्यात येतात. संध्याकाळी नातेवाईक, शेजारी आणि मित्र-मैत्रिणींना हळदी-कुंकवासाठी आणि गौरींचे दर्शन घेण्यासाठी बोलविण्यात येते.

खान्देशातील भालदेव
भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थीला खान्देशातील घराघरात भालदेव बसविण्याची जुनी परंपरा आहे. साधारण तीन, पाच, सात आणि नऊ दिवसांसाठी भालदेवची स्थापना केली जाते. घराच्या दाराजवळ भालदेव बसवला जातो. भालदेव म्हणजे शेणाचा देव. दुभत्या जनावरांचे शेण आणून ते दाराच्या बाजूला टाकले जाते. त्याचबरोबर घरातील केरकचरा या शेणावर टाकला जातो. जितके दिवस भालदेव बसवलेला असतो तितके दिवस कचरा त्यावरच टाकला जातो. भालदेवदेखील दोन प्रकारे बसवला जातो. यात ज्याच्या घरी दुभती जनावरे आहेत अशा घरी ओला भालदेव. तर, ज्यांच्या घरी नाहीत त्यांच्या घरी कोरडा भालदेव बसवला जातो. भालदेव विसर्जनाच्या दिवशी आवळीची गोंडे, फुले आणि मोहळ ठेवून पूजा केली जाते.

भालदेव बसवलेली जागा शेणाने सारवून शेणाच्याच गायी-म्हशी चारणारे गुर्‍हाखी ठेवले जातात. त्यांच्यावर आवळीची फुले, लव्हाळ उभे करुन ठेवले जाते. समोर दही भाताचा नैवेद्य दाखवला जातो. सोबतच पापड्या, सांजोर्‍या ठेऊन त्यावर दिवे लावले जातात. विधिवत पूजा करुन भलदेवाचे पूजन केले जाते. भालदेव मागे अशी आख्यायिका आहे की, घराच्या दारात बसलेला भालदेव हा आपल्या घराचा पहारेकरीच असतो. म्हणून या दरम्यान घरातील दूध दुभत्या गोष्टी विकल्या जात नाहीत. इतकंच काय तर ताकसुद्धा बाहेर कुणाला दिलं जात नाही. जास्त असेल तर ते गरीबाला घरात बोलवून खाऊ घातलं जातं. पैसेदेखील देण्याची मुभा यादरम्यान नसते. कारण दारातला भालदेव घरातलं काहीच बाहेर जाऊ देत नाही आणि बाहेरच काही येऊ देत नाही. सांजोर्‍या, पापड्या हा नैवेद्य आजूबाजूच्या घरात वाटून भालदेवाचं विसर्जन केलं जातं. दुभत्या जनावरांच्या शेणाचं पूजन करणारी खान्देशची संस्कृती नक्कीच कौतुकास्पद आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button