breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यात तालुकास्तरावर शेतकरी समन्वय समितीसह शेतकरी सन्मान, मार्गदर्शन कक्ष स्थापन होणार!

मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी

राज्यात आता तालुकास्तरावर उद्यापासून शेतकरी समन्वय समिती स्थापन करण्यात येणार असून कृषी विभागाच्या कार्यालयामध्ये शेतकरी सन्मान व मार्गदर्शन कक्ष स्थापन केला जाणार आहे, अशी माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्याच्या उद्दिष्टपूर्तीसाठी कृषी विभागामार्फत शेतकरी केंद्रबिंदू ठेवून योजना राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादकतेसोबत त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी विभागाला उपाययोजना प्रस्तावित करण्यासाठी कृषीमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत.

यासंदर्भात अधिक माहिती देताना कृषीमंत्री श्री.भुसे म्हणाले, या समितीची दर तीन महिन्यानी बैठक होणार असून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा होऊन उपाययोजना सुचविण्यात येतील. हवामान, पीक परिस्थिती, विपणन, निविष्ठांचा पुरवठा, पीककर्ज, शेतीपूरक जोडव्यवसाय, वीज जोडण्या, शेतकरी कर्जप्रकरणे आदीबाबत या समितीच्या बैठकीत चर्चा होईल.

तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरावर शेतकरी समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे. तालुका कृषी अधिकारी हे समितीचे सदस्य सचिव असतील. गटविकास अधिकारी, पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी, जलसिंचन विभागाचे उपअभियंता, कृषी विद्यापीठ, संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ प्रतिनिधी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी, मत्स्योद्योग, रेशीम, खादी ग्रामोद्योग या विभागांचे प्रतिनिधी, वीज मंडळाचे अभियंता, लिड बँकेचे प्रतिनिधी, सहकारी संस्थेचे सहायक निबंधक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव आणि तालुक्यातील तीन प्रगतीशील शेतकरी त्यापैकी एक महिला हे सदस्य म्हणून काम पाहतील.

तालुका, जिल्हा व राज्य पातळीवरील कृषी विभागाच्या कार्यालयामध्ये शेतकरी येत असतात. त्यांना विविध योजनांची माहिती देतानाच त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी एक खिडकी तत्वावर शेतकरी सन्मान व मार्गदर्शन कक्ष सुरु करण्यात येणार आहे. तेथे शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतानाच त्यावर उपाययोजना करण्यास संबंधित अधिकारी अथवा विभागाला सांगितले जाईल. या कक्षामध्ये स्वतंत्र बैठक व्यवस्थेसोबत पिण्याचे पाणी, शेतीविषयक पुस्तके, विविध योजनांची माहिती पुस्तके ठेवण्यात येणार आहे. दरमहा या कक्षातील कामकाजाचा आढावा घेण्यात येईल, असेही कृषीमंत्र्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button